Adani Ambani Toppers List: रिलायन्स समूहाचे मुकेश अंबानी आणि अदानी समूहाचे गौतम अदानी यांच्यासाठी हे वर्ष आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक ठरलं. लॅरी एलिसन यांच्यानंतर यावर्षी सर्वाधिक संपत्ती गमावणाऱ्या अब्जाधीशांच्या यादीत अंबानी आणि अदानी यांचा क्रमांक लागतो. गौतम अदानी यांनी यावर्षी आतापर्यंत १४.५ अब्ज डॉलर गमावलेत, ज्यापैकी ७.८८ अब्ज डॉलरचा फटका त्यांना केवळ शुक्रवारी बसला.
अदानींनी गमावला आशियातील दुसऱ्या श्रीमंत व्यक्तीचा मान
ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सच्या २६ जानेवारीच्या ताज्या आकडेवारीनुसार, गौतम अदानी यांच्याकडून आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती असण्याचं पद हिरावलं गेलं. आता या स्थानावर चीनचे व्यापारी झोंग शानशान विराजमान झाले आहेत. दुसरीकडे, मुकेश अंबानी यांना यावर्षी १५.१ अब्ज डॉलरचा तोटा सहन करावा लागला आहे. सध्या ९२.६ अब्ज डॉलरसह अंबानी जगातील श्रीमंतांच्या यादीत १९ व्या क्रमांकावर असून, त्यांच्यावर टॉप-२० मधून बाहेर पडण्याची टांगती तलवार आहे.
अदानींच्या संपत्तीत घसरण होण्याची कारणं
अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये शुक्रवारी १३ टक्क्यांपर्यंत घसरण पाहायला मिळाली. अमेरिकन सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनद्वारे (SEC) कथित फसवणूक आणि २६.५ कोटी अमेरिकन डॉलरच्या लाचखोरी प्रकरणात गौतम अदानी आणि सागर अदानी यांना समन्स बजावण्यासाठी न्यायालयाची मंजुरी मागितल्याच्या बातम्यांमुळे ही घसरण झाली. परंतु, अदानी समूहाने हे सर्व आरोप फेटाळून लावले असून अमेरिकन अभियोक्त्यांचे आरोप निराधार असल्याचं म्हटलं आहे. समूह सर्व कायद्यांचे पालन करतो, असं स्पष्टीकरणही देण्यात आलं आहे.
जगातील टॉप-१० अब्जाधीशांची स्थिती
ब्लूमबर्ग इंडेक्सनुसार, इलॉन मस्क हे ६९० अब्ज डॉलरच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. मस्क यांच्या संपत्तीत यावर्षी आतापर्यंत ७०.२ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.
जगातील टॉप-१० श्रीमंतांची यादी पुढील प्रमाणे: १. इलॉन मस्क: ६९० अब्ज डॉलर २. लॅरी पेज: २८१ अब्ज डॉलर (यावर्षी ११.७ अब्ज डॉलरची वाढ) ३. जेफ बेझोस: २६१ अब्ज डॉलर (शुक्रवारी ४.४८ अब्ज डॉलरची वाढ) ४. सर्गी ब्रिन: २६१ अब्ज डॉलर (यावर्षी १०.९ अब्ज डॉलरची कमाई) ५. मार्क झुकरबर्ग: २३३ अब्ज डॉलर ६. लॅरी एलिसन: २३१ अब्ज डॉलर ७. बर्नार्ड अर्नाल्ट: १९४ अब्ज डॉलर (१३.०५ अब्ज डॉलरचा तोटा) ८. स्टीव्ह बाल्मर: १६३ अब्ज डॉलर (५.६२ अब्ज डॉलरचा तोटा) ९. जेन्सेन हुआंग: १५५ अब्ज डॉलर १०. वॉरेन बफे: १४४ अब्ज डॉलर (यावर्षी ७.०५ अब्ज डॉलरचा फटका)
