Flipkart's Loss : भारतातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी आणि वॉलमार्टच्या मालकीची फ्लिपकार्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला मोठा धक्का बसला आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या चौथ्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित तोटा वाढून ५,१८९ कोटी रुपये झाला आहे. मागील आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये हा तोटा ४,२४८.३ कोटी रुपये होता. बिझनेस इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म टॉफलरने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, कंपनीचा तोटा वाढल्याचे समोर आले आहे.
कमाई वाढली, पण खर्चही वाढला
आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये फ्लिपकार्ट इंडियाच्या कामकाजातून मिळणाऱ्या उत्पन्नात १७.३% ची वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षात हे उत्पन्न ७०,५४१.९ कोटी रुपये होते, ते वाढून या वर्षी ८२,७८७.३ कोटी रुपये झाले आहे. मात्र, उत्पन्न वाढूनही कंपनीला कोणताही दिलासा मिळालेला नाही. कारण, याच काळात कंपनीचा एकूण खर्च १७.४% वाढून ८८,१२१.४ कोटी रुपये झाला. तसेच, कंपनीच्या आर्थिक खर्चातही ५७% ची वाढ होऊन तो सुमारे ४५४ कोटी रुपये झाला आहे.
भाषा वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, या आकडेवारीबद्दल फ्लिपकार्टकडून अधिकृत प्रतिक्रिया मागितली असता, कंपनीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तज्ञांच्या मते, ई-कॉमर्स क्षेत्रातील तीव्र स्पर्धा आणि सवलती देण्याच्या मॉडेलवरील सततच्या खर्चामुळे फ्लिपकार्टच्या आर्थिक स्थितीवर दबाव आला आहे. तरीही, कंपनीचे उत्पन्न वाढत असल्याने त्यांची विक्री आणि बाजारपेठेतील पोहोच वाढत असल्याचे दिसून येते.
दुसरीकडे, मिंत्राची दमदार कामगिरी
एकिकडे फ्लिपकार्टचा तोटा वाढत असताना, दुसरीकडे फॅशन आणि लाइफस्टाइल ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म असलेल्या मिंत्रा डिझाइन्स प्रायव्हेट लिमिटेडने मात्र चमकदार कामगिरी केली आहे. ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात मिंत्राचा एकत्रित नफा अनेक पटींनी वाढून ५४८.३ कोटी रुपये झाला आहे. मागील आर्थिक वर्षात कंपनीला केवळ ३०.९ कोटी रुपये रुपयांचा नफा झाला होता.
वाचा - युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसुलातही मोठी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील ५,१२१.८ कोटी रुपयांवरून तो १८% वाढून आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ६,०४२.७ कोटी रुपये झाला आहे. मिंत्राचा हा नफा सिद्ध करतो की ई-कॉमर्स क्षेत्रात योग्य धोरणे आणि लक्ष केंद्रित केल्यास नफा मिळवणे शक्य आहे.