लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बँकांचे लाभांश वितरण व नफा हस्तांतरण यासंबंधीचे नियम अधिक कडक करण्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) घेतला असून नव्या नियमांचा मसुदा जारी केला आहे. नवे नियम वित्त वर्ष २०२७ पासून लागू होतील. नव्या नियमांत भांडवली पर्याप्तता, मालमत्तेची गुणवत्ता आणि नफ्याची स्थिती यांच्याशी लाभांश थेट जोडण्यात आला आहे.
गेल्या वित्त वर्षात बँकांनी विक्रमी नफा नोंदवत ७५ हजार कोटी रुपयांचा लाभांश दिला होता. नव्या मसुद्यानुसार, भांडवली निकष पूर्ण केल्याशिवाय बँकांना लाभांश देताच येणार नाही.
जनतेकडून मागविल्या सूचना, हरकती
नव्या नियमांवर आरबीआयने जनतेकडून सूचना व हरकती मागविल्या आहेत. हितधारकांच्या अभिप्रायानंतर सुधारित मसुदा सार्वजनिक चर्चेसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. लाेकांच्या सूचना व हरकतींचा अभ्यास करून आवश्यकता भासल्यास नियमांत योग्य त्या दुरुस्त्या करण्यात येतील.
