१५ ऑगस्ट २०२५ रोजी सुरू करण्यात आलेल्या FASTag वार्षिक पासनं आतापर्यंत २५ लाख युजर्सचा टप्पा पार केला आहे आणि सुरू झाल्यानंतरच्या दोन महिन्यांत एकूण ५.६७ कोटी व्यवहार नोंदवले गेलेत. एका अधिकृत निवेदनात बुधवारी याबाबत माहिती देण्यात आली. पीटीआयच्या वृत्तानुसार, हा वार्षिक पास राष्ट्रीय महामार्गावरील युजर्ससाठी एक सोपा आणि परवडणारा प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देतो आणि तो सुमारे १,१५० टोल प्लाझावर याचा वापर करता येतो, जे राष्ट्रीय महामार्ग आणि राष्ट्रीय एक्सप्रेसवेवर आहेत.
FASTag वार्षिक पासची प्रमुख वैशिष्ट्ये :
- FASTag वारंवार रिचार्ज करण्याची गरज नाही: हा पास एकदा ₹३,००० चं शुल्क घेऊन एका वर्षाची वैधता किंवा २०० टोल प्लाझा क्रॉसिंगची सुविधा प्रदान करतो.
- नॉन कमर्शिअल वाहनांसाठी पास : हा पास अशा सर्व नॉन कमर्शिअल वाहनांसाठी वैध आहे, ज्यांना एक सक्रिय FASTag लिंक केलेला आहे.
- ऑटोमॅटिक अॅक्टिव्हेशन : हा पास एकदा शुल्क भरल्यानंतर दोन तासांच्या आत तुमच्या सध्याच्या FASTag सोबत अॅक्टिव्हेट होतो. हे शुल्क महामार्ग यात्रा ॲप (Highway Yatra App) किंवा NHAI वेबसाइटद्वारे भरलं जाऊ शकतं.
- नॉन ट्रान्सफरेबल : हा पास नॉन ट्रान्सफरेबल आहे आणि तो केवळ राष्ट्रीय महामार्ग (एनएच) आणि राष्ट्रीय एक्सप्रेसवे (एनई) टोल प्लाझावरच वैध आहे.
- राज्य मार्गांवर वापर: एक्सप्रेसवे, राज्य महामार्ग (एसएच) आणि राज्य सरकारांद्वारे किंवा स्थानिक संस्थांद्वारे व्यवस्थापित टोल प्लाझावर, FASTag सध्याच्या वॉलेट शिल्लकीचा वापर करेल, ज्याचा उपयोग राज्य महामार्गांच्या टोल आणि पार्किंग शुल्कासाठी केला जाऊ शकतो.
या पासचा उद्देश टोल वसुली प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक करणं आहे, तसंच प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि परवडणाऱ्या प्रवासाचा अनुभव प्रदान करणं आहे.