Petrol Diesel Price Today: देशात सध्या एलपीजी गॅस सिलेंडरची टंचाई आणि दुसरीकडे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत, भारतीय तेल विपणन कंपन्यांनी बुधवारी ११ मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केलेत. दिल्लीमध्ये इंडियन ऑइलच्या पंपांवर पेट्रोलची किरकोळ किंमत ९४.७७ रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत ८७.६७ रुपये प्रति लिटर इतकी नोंदवण्यात आली आहे. आज इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नसून तेल कंपन्या दररोज सकाळी ६ वाजता हे दर अपडेट करतात.
कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण
कच्च्या तेलाच्या जागतिक किमतींबाबत आज काहीसा दिलासा मिळाला आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, ब्रेंट क्रूडची किंमत आता ८७.४४ डॉलर प्रति बॅरलवर आली आहे, तर वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) सुमारे ८३ डॉलर प्रति बॅरलच्या आसपास व्यवहार करत आहे. विशेष म्हणजे सोमवारी कच्च्या तेलाचा दर १०० डॉलरच्या पार गेल्यानं चिंता वाढली होती. भारतासाठी ही आकडेवारी महत्त्वाची आहे, कारण कच्च्या तेलाच्या दरात होणाऱ्या प्रत्येक १ डॉलरच्या वाढीमुळे देशाच्या वार्षिक आयात बिलात सुमारे २ अब्ज डॉलरची भर पडते.
रिलायन्सनं जामनगर रिफानरीमध्ये वाढवलं LPG चं उत्पादन, घरगुती ग्राहकांना गॅसची कमतरता नाही
एलपीजी टंचाईची भीती
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे देशाच्या विविध भागांत एलपीजी टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू आणि राजस्थानसह अनेक राज्यांतील नागरिकांनी गॅस मिळत नसल्याच्या तक्रारी केल्यात. अनेक शहरांमध्ये गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. हॉर्मुज जलमार्गातून होणारा गॅस पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे भारताच्या एकूण ३० टक्के गॅस पुरवठ्यावर परिणाम झालाय. यामुळे बंगळुरू, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई सारख्या मोठ्या शहरांतील हॉटेल आणि रेस्टॉरंट्स बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
विविध राज्यांमधील सद्यस्थिती आणि गोंधळ
उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये एका सिलेंडरसाठी लोकांना तासनतास रांगेत उभं राहावं लागत आहे. एजन्सीमधील कर्मचाऱ्यांशी ग्राहकांचे वाद होत असून, मंगळवारी लालबाग येथील एका एजन्सीमध्ये ग्राहकांनी मोठा गोंधळ घातला. झारखंडमध्ये मध्य-पूर्वेतील युद्धामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा सध्या थांबवण्यात आला आहे, ज्यामुळे हॉटेल चालकांची चिंता वाढली. येथे सध्या उपलब्ध साठ्यातून रेशनिंगच्या आधारे मर्यादित पुरवठा केला जात आहे. उत्तराखंडमध्येही व्यावसायिक सिलेंडर्सचा पुरवठा विस्कळीत झाल्यानं उद्योग, हॉटेल आणि पर्यटन व्यवसायावर मोठं संकट ओढवलंय. अनेक जिल्ह्यांत गॅसचा पुरवठा पूर्णपणे बंद झालाय.
आजचे एलपीजी सिलेंडरचे दर
देशातील प्रमुख शहरांमध्ये आज एलपीजी सिलेंडरचे दर वेगवेगळे आहेत. दिल्लीमध्ये १९ किलोचा व्यावसायिक सिलेंडर १८८३ रुपयांना मिळत आहे, तर घरगुती सिलेंडरचा दर ९१३ रुपये आहे. कोलकातामध्ये व्यावसायिक सिलेंडर १८७५.५० रुपये आणि घरगुती सिलेंडर ९३९ रुपयांना उपलब्ध आहे. मुंबईत व्यावसायिक सिलेंडरचे दर १८३५ रुपये, तर घरगुती सिलेंडरचे दर ९१२.५० रुपये इतके आहेत. चेन्नईमध्ये आज व्यावसायिक सिलेंडर २०४३.५० रुपयांना मिळत असून घरगुती सिलेंडरसाठी ९२८.५० रुपये मोजावे लागत आहेत.
