Donald Trump On Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा टॅरिफचे फायदे सांगितले आहेत. यासंदर्भात त्यांनी एक सोशल मीडियावर पोस्ट देखील शेअर केलीये. आपल्या नेतृत्वाखाली अमेरिका सातत्यानं प्रगती करत असल्याचं म्हणत अमेरिकेच्या टॅरिफवर टीका करणाऱ्यांचा त्यांनी 'मूर्ख' असा उल्लेख केलाय. यासोबतच, त्यांनी टॅरिफ महसुलातून (Tariff Revenue) जवळजवळ प्रत्येक अमेरिकन व्यक्तीला $२००० डिव्हिडंड म्हणून देण्याचं आश्वासनही दिले.
टॅरिफचे फायदे सांगितले, टीकाकारांना लक्ष्य केले
जगाला आपल्या टॅरिफनं घाबरवून सोडणारे डोनाल्ड ट्रम्प, या टॅरिफमुळे अमेरिकेला होणारे फायदे सतत सांगत आहेत. त्यांनी ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्मवर नवीन पोस्टमध्ये आपल्या व्यापार धोरणाचा प्रचार केला आणि दावा केला की त्यांच्या नेतृत्वाखाली अमेरिका हा जगातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात आदरणीय देश आहे, जिथे स्टॉकचं मूल्य विक्रमी स्तरावर आहे, हाय ४०१(K) बॅलन्स आणि कारखान्यांमध्ये सर्वत्र वाढ होत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफचा अमेरिकेच्या आर्थिक मजबुतीसाठी एक प्रमुख घटक म्हणून उपयोग करत बचाव केला. यासोबतच, त्यांनी याच्या विरोधात असलेल्या लोकांवर आणि टॅरिफवर टीका करणाऱ्यांवरही निशाणा साधला. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, "जे लोक टॅरिफच्या विरोधात आहेत, ते मूर्ख आहेत!" अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी असा युक्तिवाद केला की टॅरिफमुळे गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधींना चालना मिळाली आहे.
'प्रत्येक अमेरिकन व्यक्तीला $२००० मिळतील'
टॅरिफच्या टीकाकारांना मूर्ख ठरवत, माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ट्रुथ सोशल पोस्टमध्ये एक मोठं आश्वासन दिले. त्यांनी सांगितलं की, अमेरिकेच्या टॅरिफ महसुलातून जवळजवळ सर्व अमेरिकन लोकांना (उच्च उत्पन्न असलेल्या लोकांना वगळून) टॅरिफ डिव्हिडंडचा भाग म्हणून $२००० चं पेमेंट केलं जाईल. परंतु, हे पेमेंट कसं आणि कधी होईल हे त्यांनी स्पष्ट केलं नाही.
टॅरिफमधून अब्जावधींची कमाई, कर्ज कमी करणार
ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पुढे लिहिलंय की, "टॅरिफमधून येणाऱ्या महसुलातून अमेरिकेला ट्रिलियन्स ऑफ डॉलर्सचं उत्पन्न मिळत आहे आणि याचा उपयोग अमेरिकेवरील राष्ट्रीय कर्ज, जे आता $३७ ट्रिलियन झालं आहे, ते फेडण्यास सुरुवात करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो." टॅरिफबाबत ट्रम्प यांचा हा ताजा दावा अशा वेळी करण्यात आला आहे, जेव्हा त्यांच्या या टॅरिफ कार्यक्रमाला कायदेशीर अनिश्चिततेचा सामना करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात गेल्या काही दिवसांत माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावरून जोरदार वादविवाद झाला होता. सुमारे अडीच तास चाललेल्या सुनावणीत न्यायाधीशांनी टॅरिफच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी तर अमेरिकेचे सॉलिसिटर जनरल डी. जॉन सॉअर यांना असंही सांगितले होते की, टॅरिफ हे अमेरिकन लोकांवर कर लावण्यासारखे आहे आणि अमेरिकेच्या संविधानानुसार, कर आणि टॅरिफ लावण्याचा अधिकार काँग्रेसकडे आहे.
