EPFO : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या सदस्यांसाठी 'निधी आपके निकट २.०' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 'आझादी का अमृत महोत्सव' अंतर्गत हा कार्यक्रम २७ नोव्हेंबर २०२५ रोजी देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये आयोजित केला जाईल. या उपक्रमाचा मुख्य उद्देश भविष्य निर्वाह निधी सदस्य, मालक आणि पेन्शनधारकांच्या समस्यांचे जागेवरच निराकरण करणे हा आहे.
सरकारची नवीन मोहीम
ज्या ग्राहकांना ईपीएफओ संबंधित कोणतीही समस्या असेल, ते या कॅम्पमध्ये येऊन आपली समस्या सोडवू शकतात. या कॅम्पमुळे लोकांना ईपीएफओच्या योजना आणि सेवांबद्दल माहिती मिळण्यास मदत होईल. तसेच सर्व प्रकारच्या शंकांचे निरसन केले जाईल.
EPFO आणि EPS नियमांमधील महत्त्वाचे बदल
१. पेन्शन कधी मिळणार?
जर एखादा कर्मचारी ईपीएफओमध्ये १० वर्षे योगदान देतो, तर तो पेन्शन मिळण्यास पात्र ठरतो. ही पेन्शन त्याला ५८ वर्षे पूर्ण झाल्यावर मिळते. कर्मचारी ५० वर्षांनंतरही पेन्शन घेऊ शकतो. परंतु, त्यावेळी कपातीसह पेन्शन मिळेल.
२. EPS फंड काढण्याचा नवीन नियम
ईपीएफओच्या नवीन नियमानुसार, जर एखादी व्यक्ती दीर्घकाळ बेरोजगार असेल, तर आता त्याला आपली पेन्शनची रक्कम २ महिन्यांनंतर नव्हे, तर ३६ महिन्यांनंतर काढता येईल. सरकारने हा निर्णय लोकांची दीर्घकालीन सामाजिक सुरक्षा म्हणजेच भविष्यातील पेन्शन सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी घेतला आहे.
३. PF वरील व्याजावर कर कधी लागतो?
सामान्यतः पीएफवरील व्याजावर कर लागत नाही. परंतु, तुमचे वार्षिक योगदान २.५ लाख (खासगी कर्मचाऱ्यांसाठी) पेक्षा जास्त नसेल तरच. योगदान या मर्यादेपेक्षा जास्त असल्यास, अतिरिक्त रकमेवर मिळणारे व्याज करपात्र होते. याशिवाय, ५ वर्षांची सलग सेवा पूर्ण न करता पैसे काढल्यास काही विशिष्ट परिस्थितीत कर लागू होऊ शकतो.
वाचा - ५ लाखांपर्यंतचे उपचार फ्री! आता घरबसल्या बनवा 'आयुष्मान कार्ड'! 'या' कागदपत्रांची आवश्यकता
निवृत्तीनंतर PF व्याजावर कर का लागतो?
नोकरी सोडताच किंवा निवृत्तीनंतर कर्मचारी आणि मालक दोघांचेही पीएफमधील योगदान थांबते. अशा परिस्थितीत, तुम्ही कर्मचारी श्रेणीत येत नाही. निवृत्तीनंतर तुमच्या पीएफ खात्यात जमा होणारे व्याज करपात्र मानले जाईल. निवृत्तीनंतर मिळणारे हे व्याज 'उत्पन्नाचे इतर स्रोत' या श्रेणीत गणले जाते आणि त्यावर तुमच्या स्लॅबनुसार कर लागतो.
