नवी दिल्ली - भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी रेपो रेटमध्ये ०.२५ टक्के म्हणजेच २५ बेसिस पॉईंट्सनं कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता रेपो रेट ६.५० टक्क्यावरून ६.२५ टक्के इतका झाला आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाने ना केवळ कर्ज स्वस्त होईल तर EMI चा बोझाही हलका होणार आहे. केंद्रीय बँकेने मॉनेटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीनंतर रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला. जवळपास ५ वर्षांनी रेपो रेटमध्ये घट झाल्याने कर्जदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रेपो रेट कमी झाल्यानं बँकांकडून मिळणाऱ्या कर्जाच्या व्याजदारातही घट होईल. त्यात पर्सनल लोन, होम लोन, कार लोनसह इतर EMI ही घटणार आहेत. या निर्णयामुळे महागाईतून सर्वसामान्यांना काहीसा दिलासाही मिळेल. ज्या लोकांना कर्ज घ्यायचे आहे त्यांना कमी व्याजदरात कर्ज मिळणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयानं कर्ज घेणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होण्याची शक्यता आहे.
किती कमी होणार EMI?
पर्सनल लोनवर बचत - समजा, तुम्ही ५ लाख रुपये पर्सनल लोन १२ टक्के व्याजदराने घेतले आहे. या कर्जाचा कालावधी ५ वर्ष आहे. रेपो रेट ०.२५ टक्के कमी झाल्याने व्याजदरही ११.७५ टक्के होणार आहे.
जुना EMI - ११,१२२ रूपये (१२ टक्के)
नवीन EMI - ११,०५९ रूपये (११.७५ टक्के)
वार्षिक बचत - ७५६ रूपये
कार लोनवर बचत - समजा, तुम्ही १० लाखांची कार खरेदी करण्यासाठी ९ टक्के व्याजदराने कर्ज घेतले असेल. हे कर्ज ७ वर्षात फेडायचे आहे तर तुमची किती बचत होईल
जुना EMI - १६,०८९ रुपये (९ टक्के)
नवीन EMI - १५,९६२ रूपये (८.७५ टक्के)
वार्षिक बचत - १५२४ रूपये
गृह कर्जावर बचत - समजा, तुम्ही २५ वर्षासाठी बँकेकडून ५० लाखाचे गृह कर्ज घेतले. सध्या गृह कर्जाचा दर ९ टक्के आहे. रेपो रेट ०.२५ टक्क्यांनी कमी झाल्याने हा व्याजदर ८.७५ टक्के होईल.
जुना EMI - ४१,९६ रूपये (९ टक्के)
नवीन EMI - ४१,१०७ रूपये (८.७५ टक्के)
वार्षिक बचत - १०, २३६ रूपये