E Aadhaar App: भारतात लवकरच फोनवरून आधार कार्ड अपडेट करण्याची सेवा सुरू होणार आहे. ही सेवा सुरू झाल्यावर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला आधार केंद्राच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) 'ई-आधार ॲप' नावाचे एक नवीन मोबाईल ॲप आणत आहे. या ॲपद्वारे तुम्ही जन्म तारीख, पत्ता आणि फोन नंबर बदलू शकाल. यासाठी तुम्हाला आधार केंद्रात जाण्याची गरज भासणार नाही. ही सुविधा या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबर २०२५ पासून सुरू केली जाईल.
ई-आधार ॲपमध्ये काय सुविधा मिळतील?
ई-आधार ॲप असल्यामुळे तुम्हाला एकाच ठिकाणी अपडेट्स करण्याची सोय मिळेल. तुम्ही तुमच्या फोनमध्ये ई-आधार ॲप इन्स्टॉल करून अनेक बदल करू शकता, जसं की जन्म तारीख आणि वय अपडेट करणं. आधार कार्डमधील पत्ता बदलायचा असल्यास, तोही कोणत्याही अडचणीशिवाय बदलेल. आधार कार्डशी जोडलेला फोन नंबर देखील तुम्ही अपडेट करू शकता. मात्र, काही बदल असे असतील जे केवळ फिंगरप्रिंट किंवा डोळ्यांचे स्कॅन करण्यासाठी आधार केंद्रात गेल्यावरच शक्य होतील.
आठवड्याची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, PSU Bank च्या शेअर्समध्ये तेजी
ओळख स्मार्ट पद्धतीनं होईल
ई-आधार ॲपमध्ये केवळ या गोष्टी अपडेट होणार नाहीत, तर सुरक्षाही वाढेल. यात एआय (AI) आणि फेस आयडीचा वापर होईल. यामुळे तुमची ओळख सुरक्षित पद्धतीने होईल. शिवाय, फसवणुकीची शक्यता कमी होईल. चुकीच्या लोकांनी आधारचा गैरवापर करू नये, हेच UIDAI चं उद्दिष्ट आहे. फेस आयडीद्वारे तुमचा चेहरा जुळल्यास त्यानंतरच माहिती अपडेट होईल.
स्वतः डिटेल्स भरू शकाल
आधार अपडेट करणं पूर्वी कठीण होते. लांब रांगा, वेळेचा अपव्यय आणि कागदपत्रं जमा करण्याचा त्रास अनेकांना सहन करावा लागायचा. विशेषत: ग्रामीण भागातून किंवा लांबून येणाऱ्या लोकांना त्रास व्हायचा. आता ॲपमुळे सर्व काही एकाच ठिकाणी होईल. पासपोर्ट, पॅन, ड्रायव्हिंग लायसन्ससारख्या सरकारी डेटाबेसची माहिती तुम्ही स्वतः भरू शकाल. यामुळे प्रक्रिया जलद होईल. हे पाऊल डिजिटल इंडियाला बळकट करेल.
फोन नंबर जोडा, मगच ॲप उघडेल
तुम्हालाही आधारमध्ये काही बदल करायचे असल्यास, ॲप येण्यापूर्वीच तुम्ही पूर्ण तयारी करू शकता. आपला फोन नंबर आधारसोबत रजिस्टर करुन ठेवा, कारण तो अनेक सेवांसाठी आवश्यक आहे. पत्ता किंवा जन्म तारीख बदलण्यासाठी वैध पुरावे तयार ठेवा. ॲप आल्यावर अपडेट करा आणि आधार केंद्रात न जाता माहिती अपडेट करा.
