मागील काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर कर लादण्याचा इशारा देण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसापूर्वी त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेवर टीकाही केली होती. ट्रम्प यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचे 'डेड इकॉनमी' असे वर्णन केले होते. म्हणजेच मृत अर्थव्यवस्था असे म्हटले आहे. पण, आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याच कंपनीने त्यांच्या दाव्याची पोलखोल केली आहे.'द ट्रम्प ऑर्गनायझेशन'या कंपनीने ही पोलखोल केली. आता अमेरिकेबाहेर या कंपनीसाठी सर्वात मोठी बाजारपेठ भारत बनला आहे. गेल्या दशकात ट्रम्प यांच्या कंपनीने भारतात किमान १७५ कोटी रुपये कमावले आहेत. हे उत्पन्न मुंबई, पुणे, कोलकाता आणि गुरुग्राममध्ये पसरलेल्या सात रिअल इस्टेट प्रकल्पांमधून मिळाले असल्याची मोठी माहिती समोर आली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या कंपनीने भारतात विस्तार सुरू केला. मागील आठ महिन्यांत, 'द ट्रम्प ऑर्गनायझेशन'ने त्यांच्या भारतीय भागीदार ट्रिबेका डेव्हलपर्ससोबत ६ नवीन प्रकल्पांची घोषणा केली. हे प्रकल्प गुरुग्राम, पुणे, हैदराबाद, मुंबई, नोएडा आणि बंगळुरू येथे आहेत. या प्रकल्पांतर्गत एकूण ८० लाख चौरस फूट रिअल इस्टेट क्षेत्र विकसित केले जाईल. यापैकी गुरुग्राम, पुणे आणि हैदराबाद येथे सुमारे ४३ लाख चौरस फूटाचे तीन प्रकल्प या वर्षी सुरू झाले आहेत.
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
२०१२ मध्येच भारतात प्रकल्प जाहीर
ट्रम्प यांच्या कंपनीने २०१२ मध्येच भारतात प्रकल्प सुरू केले आहेत. २०२४ पर्यंत 'ट्रम्प ऑर्गनायझेशन'चे भारतातील एकूण विकसित रिअल इस्टेट क्षेत्र ३० लाख चौरस फूट होते. ६ नवीन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, कंपनीचा विस्तार जवळजवळ चार पटीने वाढून १.१० कोटी चौरस फूट होईल. ट्रम्प यांची उपकंपनी असलेल्या ट्रिबेकाने नवीन प्रकल्पांमधून १५ हजार कोटी रुपयांच्या विक्रीची आशा व्यक्त केली आहे.
'ट्रम्प ऑर्गनायझेशन' बांधकामात थेट गुंतवणूक करत नाही. ही कंपनी त्यांच्या ब्रँड नेमला परवाना देते. त्या बदल्यात, कंपनीला आगाऊ शुल्क, डेव्हलपमेंट कर किंवा विक्रीच्या ३ ते ५ टक्के रक्कम मिळते. ट्रम्प ब्रँडच्या मालमत्ता लक्झरी विभागात विकल्या जातात, यामुळे त्यांना प्रीमियम दर मिळतात.
भारतात अनेक मोठ्या कंपन्या ट्रम्प प्रकल्प विकसित करत आहेत. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, लोढा ग्रुप, M3M ग्रुप, पंचशील रिअॅल्टी, युनिमार्क ग्रुप, IRA इन्फ्रा सारख्या स्थापित रिअल इस्टेट कंपन्यांचा समावेश आहे. कल्पेश मेहता यांच्या नेतृत्वाखालील ट्रिबेका डेव्हलपर्स ही भारतातील 'द ट्रम्प ऑर्गनायझेशन'ची अधिकृत भागीदार आहे.
'द ट्रम्प ऑर्गनायझेशन'च्या भारतातील १३ प्रकल्पांपैकी २ पूर्णपणे तयार आहेत. दोन शेवटच्या टप्प्यात आहेत, तीनचे बांधकाम अजूनही सुरुवातीच्या टप्प्यात आहे. तेच तीन प्रकल्प सुरू होण्याची वाट पाहत आहेत. याशिवाय, दोन प्रकल्प सध्या अडकले आहेत. एकाची घोषणा अजूनही व्हायची आहे.
डोनाल्ड ट्रम्प या कंपनीचे संस्थापक
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे या कंपनीचे संस्थापक आहेत. ते २०१७ पर्यंत कंपनीचे सीईओ आणि अध्यक्ष होते. त्यांचे पुत्र डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर आणि एरिक ट्रम्प हे त्याचे कार्यकारी उपाध्यक्ष आहेत. या कंपनीचे मुख्यालय न्यूयॉर्कमध्ये आहे. २०१७ मध्ये अध्यक्ष झाल्यानंतर ट्रम्प यांनी कंपनीच्या दैनंदिन कामापासून स्वतःला दूर केले. त्यांनी एक ट्रस्ट स्थापन केला आणि कंपनीची मालकी स्वतःकडे ठेवली आणि त्यांच्या मुलांना कामकाजाचे अधिकार सोपवले. २०२१ पासून ट्रम्प या संस्थेच्या अध्यक्षपदी आहेत.