Indian Products In America: अमूल आणि आयटीसीसारख्या भारतातील काही मोठ्या वस्तू उत्पादक अमेरिकेत माल पाठवण्याचे नवे मार्ग शोधत आहेत. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, ज्या देशांमध्ये कर कमी आहे अशा देशांमध्ये ते कंपनी उभारू शकतात. किंवा ते अमेरिकेत कंपनी उभारू शकतात. कारण अमेरिकेनं भारतातून येणाऱ्या वस्तूंवरील कर वाढवला आहे.
पार्ले प्रॉडक्ट्स, एडब्ल्यूएल अॅग्री बिझनेस आणि गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स सारख्या कंपन्या अमेरिकेत पीठ, नूडल्स, बिस्किटं, फ्रोजन फूड आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री करतात. या वस्तू प्रामुख्यानं अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय लोकांसाठी असलेल्या दुकानांमध्ये मिळतात. बुधवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील कर दुप्पट करून ५० टक्के केला. यामुळे भारतातील वस्तू विक्रेत्यांना त्याचा त्यांच्यावर काय परिणाम होईल, याची चिंता सतावत आहे. तथापि, बहुतेक कंपन्यांसाठी, अमेरिकेत होणारी निर्यात त्यांच्या एकूण कमाईचा एक छोटासा भाग आहे. पण त्यात सातत्यानं वाढ होत होती.
कंपन्यांचा प्लान काय?
अमूल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता म्हणाले की, अमूल आधीच अमेरिकेत दूधाचं उत्पादन करत आहे आणि विकत आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ते स्वस्त होतं. आता ते तिथेही पनीर, चीज आणि बटर बनवण्याची योजना आखत आहेत. त्यांना भारतातून पाठवण्याऐवजी ते अमेरिकेत बनवायचं आहे. जयेन मेहता म्हणाले की, अमेरिकेत दुग्धजन्य पदार्थांवर आधीच ६०-७०% कर आकारला जातो. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या नवीन करामुळे भारतातून वस्तू पाठवणं महाग होईल.
कंपनीच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं, आयटीसी दुबईहून बिस्किटे, फ्रोजन फूड, कोळंबी आणि तयार पदार्थ पाठवू शकते. अमेरिका भारतावर जास्त कर लावत राहील की नाही हे ते काही महिन्यांनंतर ठरवतील. आयटीसी सध्या दुबईमध्ये पीठ पॅक करते आणि ते अमेरिकेला पाठवते. कारण भारतात गहू आणि गव्हाच्या उत्पादनांच्या निर्यातीवर बंदी आहे. अमेरिकेने यूएईवर १०% आणि मेक्सिकोवर २५% कर लादलाय.
तर दुसरीकडे एअर कंडिशनर उत्पादक ब्लू स्टारचे व्यवस्थापकीय संचालक बी. त्यागराजन म्हणाले की, त्यांच्याकडे मेक्सिकोमध्ये कारखाना उभारण्याचा पर्याय आहे. यामुळे ते अमेरिकेला वस्तू विकू शकतील.