America Trump Tariff On India: अमेरिकेत वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक मोठं पाऊल उचललं आहे. २५० हून अधिक खाद्यपदार्थांवरील आयात शुल्क कमी करण्याच्या या निर्णयामुळे केवळ अमेरिकेच्या ग्राहकांनाच नव्हे, तर भारतातील शेतकरी आणि कृषी निर्यातदारांच्या चेहऱ्यावरही हसू फुललं आहे.
या निर्णयामुळे भारताच्या कृषी निर्यातीला २.५ ते ३ अब्ज डॉलर, म्हणजे सुमारे ₹२२,००० ते ₹२६,००० कोटी रुपयांचा थेट फायदा मिळण्याची शक्यता आहे. वाढत्या टॅरिफमुळे भारताची अनेक उत्पादनं अमेरिकेच्या बाजारपेठेत मागे पडत असताना, हा निर्णय नवीन आशेचं किरण घेऊन आला आहे.
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
भारताला मिळेल मोठा लाभ
अमेरिकेनं ज्या २५० खाद्यपदार्थांवरील आयात शुल्क कमी केलं आहे, त्यात २२९ कृषी वस्तूंचा समावेश आहे. भारताची मजबूत पकड असलेल्या मसाले, चहा, कॉफी, काजू आणि अनेक फळे-भाज्यांवर लावलेल्या मोठ्या शुल्कामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून निर्यातीवर मोठा परिणाम झाला होता. ट्रम्प प्रशासनानं ५०% पर्यंत टॅरिफ वाढवल्यानंतर भारतीय मसाल्यांची निर्यात घसरणीच्या दिशेनं चालली होती, तर हे क्षेत्र अमेरिकेत ३५.८ कोटी डॉलरची बाजारपेठ राखतो. चहा-कॉफीमध्येही भारत दरवर्षी ८.२ कोटी डॉलरपेक्षा जास्त निर्यात करतो. आता टॅरिफ कमी झाल्यामुळे परिस्थितीत वेगानं बदल होण्याची अपेक्षा आहे. विशेषत: काळी मिरी, वेलची, जिरे, हळद, आले आणि प्रीमियम फ्रूट प्रोडक्ट्स सारख्या उच्च-मूल्याच्या श्रेणींमध्ये निर्यात वाढण्याची पूर्ण शक्यता आहे.
कोणत्या क्षेत्राला सर्वाधिक फायदा?
ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हचे संस्थापक अजय श्रीवास्तव यांनी सांगितलं की, अमेरिकेची ही नवीन सूट भारतासाठी एक मोठी संधी आहे आणि यामुळे सुमारे तीन अब्ज डॉलर पर्यंतच्या निर्यातीला फायदा होऊ शकतो. हा दिलासा विशेषतः त्या क्षेत्रांसाठी वरदान ठरेल, ज्यात भारताची गुणवत्ता आणि उत्पादन क्षमता मजबूत आहे. तज्ज्ञांनुसार, भारताचा सर्वात मोठा फायदा खालील क्षेत्रांमध्ये होईल:
- मसाले आणि हर्ब्स
- उच्च-मूल्याची फलोत्पादन उत्पादनं
- चहा, कॉफी आणि काजू
- फळांची प्रीमियम उत्पादनं
काही क्षेत्रांना मिळणार नाही मोठा लाभ
तरीही, प्रत्येक उत्पादनाला समान लाभ मिळण्याची शक्यता नाही. ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हचे (GTRI) संस्थापक अजय श्रीवास्तव यांच्या मते, ज्या वस्तूंवर अमेरिकेच्या सूटीचा सर्वात जास्त परिणाम आहे, त्यात अमेरिकेत भारताची खूप मजबूत पकड नाही. त्यामुळे यात मोठी वाढ मर्यादित राहू शकते. परंतु मसाले आणि विशेष फलोत्पादन उत्पादनांमध्ये मागणी पुन्हा वाढण्याची पूर्ण आशा आहे, विशेषत: टॅरिफ वाढल्यानंतर ही मागणी खूप कमी झाली होती.
ट्रम्प यांचा यू-टर्न का?
ट्रम्प प्रशासन बऱ्याच काळापासून हा दावा करत होते की टॅरिफमुळे महागाई वाढणार नाही, परंतु अमेरिकेच्या ग्राहकांमध्ये वाढता असंतोष आणि खाद्यपदार्थांच्या सतत वाढणाऱ्या किमतींमुळे सरकारला आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास भाग पाडले. देशांतर्गत महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि लोकांना दिलासा देण्यासाठी अखेरीस हे मोठं पाऊल उचलण्यात आलंय.
भारताच्या अर्थव्यवस्थेला मिळेल नवी गती
एप्रिलमध्ये ५०% पर्यंत शुल्क लागल्यानंतर भारताची निर्यात सप्टेंबरमध्ये १२% नं घसरून ५.४३ अब्ज डॉलरवर पोहोचली होती. त्यामुळे हा दिलासा केवळ शेतकऱ्यांसाठीच नाही, तर भारताच्या अर्थव्यवस्थेसाठीही महत्त्वाचा आहे. टॅरिफ कमी झाल्यामुळे भारतीय उत्पादनं पुन्हा अमेरिकेच्या बाजारपेठेत स्पर्धात्मक बनतील.
