हृतिक रोशनचा 'धूम-२' चित्रपट तुम्ही पाहिलाच असेल. त्यात म्युझियमच्या आत अनोख्या पद्धतीनं चोरी केल्याची दृष्यं होती. अशीच एक घटना फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील प्रसिद्ध 'लूव्र म्युझियम'मध्ये घडली आहे, जिथे चोर ७ मिनिटांत ८०० कोटी रुपयांचे दागिने घेऊन फरार झाले. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, हा सगळा प्रकार सकाळी ९ ते ९.३० च्या दरम्यान घडला, जेव्हा पर्यटकांची खूप गर्दी असते.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, ही चोरीची घटना इतक्या सहजपणे कशी पार पडली? याचं उत्तर आहे - निष्काळजीपणा आणि बेफिकीरी. पोलीस आणि म्युझियमच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना कल्पनाही नव्हती की चोरी इतक्या सहजपणे होऊ शकते. वास्तविक, चोरांनी हायड्रॉलिक ट्रकचा वापर केला, ज्याला शिडी लावलेली होती. हा ट्रक तलावाच्या बाजूला, म्हणजेच म्युझियमच्या मागील भागात उभा करून, त्याची शिडी म्युझियमच्या खिडकीपर्यंत उचलून नेली. त्यानंतर या शिडीनं दुसऱ्या मजल्यावरील खिडकीपर्यंत पोहोचले आणि बॅटरी असलेल्या कटरनं काच कापून म्युझियममध्ये घुसले.
७ मिनिटांत झाली चोरी
पॅरिससारख्या सुरक्षित शहराच्या मध्यभागी असलेल्या या म्युझियममध्ये अवघ्या ७ मिनिटांत चोरीची घटना पार पडली. चोर खिडकीतून म्युझियममध्ये पोहोचले आणि सुरक्षा कर्मचाऱ्याना धमकावून जागा रिकामी करण्यास भाग पाडलं. यानंतर, काचेच्या आत ठेवलेले दुर्मिळ आणि अमूल्य दागिने काढून आपल्या बॅगमध्ये भरले आणि त्याच खिडकीतून खाली ट्रकमध्ये परत आले. पळून जाण्यासाठी चोरांनी ट्रकचा वापर न करता स्कूटरचा आधार घेतला, जेणेकरून अरुंद गल्ल्यांमधून लपण्याच्या ठिकाणांपर्यंत लवकर पोहोचता येईल. हे संपूर्ण काम केवळ ७ मिनिटांत पूर्ण झालं.
चोरांनी काय-काय चोरलं?
फ्रान्सच्या सांस्कृतिक मंत्रालयानं चोरीची पुष्टी केली आहे आणि सांगितलं की हे सर्व दागिने १९ व्या शतकातील आहेत, जे फ्रान्सच्या शाही कुटुंबाचा आणि साम्राज्याचा भाग राहिले आहेत. चोरांनी ८ अमूल्य दागिने चोरले आहेत, ज्यात शाही कुटुंबाचा मुकुट, नेकलेस, कानातील बाळ्या आणि ब्रोच यांचा समावेश आहे. सर्व दागिन्यांमध्ये हजारो हिरे आणि इतर मौल्यवान रत्ने जडलेली आहेत. दोन मौल्यवान वस्तू घटनास्थळीच पडलेल्या आढळल्या, ज्या चोर घेऊन जाण्यात अपयशी ठरले.
नेपोलियनच्या पत्नीचा मुकुटही चोरीला
चोरांनी फ्रान्सचा सम्राट नेपोलियन-३ ची पत्नी महाराणी यूजीनचा मुकुट आणि ब्रोच देखील चोरला. याशिवाय महाराणी लुइजचा पाचूचा हार आणि बाळ्या देखील चोर घेऊन गेले. महाराणी मेरी-अमेली आणि महाराणी हार्तेंस यांचे नीलम पासून बनलेले मुकुट, हार आणि बाळ्या यांच्यासह एक रिक्ल्वेरी ब्रोचदेखील चोरीला गेला आहे. यापैकी काही नेकलेसमध्ये १,००० हून अधिक हिरे जडलेले आहेत, तर एक नेकलेस २,००० हिऱ्यांनी बनलेला आहे. जर याची किंमत मोजली, तर ती सुमारे ८.८ कोटी युरो म्हणजे ८०० कोटी रुपयांच्या आसपास असेल.
चोरीसाठी बदनाम संग्रहालय
पॅरिसमधील हे म्युझियम अनेक वर्षांपासून चोरीसाठी बदनाम राहिले आहे. येथील चोरीची सर्वात मोठी घटना १९११ मध्ये समोर आली होती, जेव्हा लिओनार्डो दा विंची यांनी काढलेलं प्रसिद्ध मोनालिसाचे पेंटिंग चोरीला गेलं होतं, जे नंतर एका इटालियन व्यक्तीकडून जप्त करण्यात आलं. यानंतर १९८३ मध्ये १६ व्या शतकातील चिलखत चोरीला गेलं, जे २०११ मध्ये सापडलं. त्यानंतर १९९८ मध्ये १९ व्या शतकातील कलाकार कॅमील कोरो यांचे प्रसिद्ध पेंटिंग 'द सेव्र रोड' देखील चोरीला गेलं, जे अद्याप सापडलं नाही. फ्रान्समधील केवळ याच म्युझियममधून नाही, तर इतर दुसऱ्या म्युझियममधूनही सातत्यानं चोरीच्या घटना समोर येत असतात. गेल्या महिन्यात सप्टेंबरमध्येच 'एड्रियन डुबूशे म्युझियम'मधून चोरांनी ९५ लाख युरोच्या (सुमारे ९० कोटी रुपये) कलाकृती चोरीला गेल्या. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये 'कॉन्याक जे म्युझियम'मधून ७ ऐतिहासिक वस्तू चोरीला गेल्या. याच वेळी 'हीरॉन म्युझियम'मध्येही लुटारूंनी करोडो रुपयांच्या कलाकृती लुटल्या.