Operation Sindoor : भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' राबवत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला करुन पहलगाम घटनेचा बदला घेतला आहे. या घटनेचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून येत आहे. एकीकडे पाकिस्तानचा कराची शेअर बाजार कोसळला आहे. तर दुसरीकडे भारतीय शेअर बाजारात डिफेन्स स्टॉक्सने झेप घेतली आहे. पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या डिफेन्स शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. यापूर्वी भारत आणि पाकिस्तानमधील तणावादरम्यान विविध डिफेन्स स्टॉक्स वधारत होते. आजच्या हल्ल्यानंतर यात मोठी वाढ झाली.
आज सकाळी १०.३० च्या सुमारास, कंपनीचा शेअर २.१६% वाढीसह १,३८४.०० रुपयांवर व्यवहार करत होता. संरक्षण आणि सिविल ड्रोन बाजारपेठेत शक्यतांचा शोध घेण्यासाठी इस्रायली कंपनी हेव्हेंड्रोनसोबत करार केला असल्याचे घोषणा कंपनीने केली आहे.
कंपनीच्या नफ्यात दुप्पट वाढ
एरोस्पेस आणि संरक्षण उद्योगाशी संबंधित कंपनी पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड आपले शेअर्स दोन भागात विभागणार आहे. संरक्षण कंपनी १० रुपयांच्या दर्शनी मूल्याच्या शेअर्सचे ५ रुपयांच्या दर्शनी मूल्याच्या २ शेअर्समध्ये विभाजन करेल. कंपनीने अद्याप शेअर्सच्या विभाजनाची रेकॉर्ड तारीख जाहीर केलेली नाही. जानेवारी-मार्च २०२५ च्या तिमाहीत पारस डिफेन्सचा नफा जवळजवळ दुप्पट झाला आहे.
मार्च २०२५ च्या तिमाहीत कंपनीचा नफा सुमारे ९७ टक्क्यांनी वाढून १९.७ कोटी रुपये झाला आहे. एका वर्षापूर्वी त्याच वेळी कंपनीने १० कोटी रुपयांचा नफा कमावला होता. कंपनीने आपला पहिला लाभांश देखील जाहीर केला आहे. कंपनी प्रत्येक शेअरवर ०.५० रुपये लाभांश देणार आहे.
वाचा - हल्ला जमिनीवर, परिणाम आकाशात! पाकिस्तानचं हवाई क्षेत्र पूर्णपणे रिकामं; अर्थव्यवस्थेला बसणार खिळ?
३ वर्षात ११९.५१ टक्के परतावा
पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडची आयपीओ किंमत १७५ रुपये होती. आज कंपनीच्या शेअरची किंमत १,३६६.२० रुपये आहे. गेल्या २ आठवड्यात कंपनीच्या शेअर्समध्ये २७.५५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये ४८.९५ टक्क्यांची वाढ झाली आहे. ३ महिन्यांत ३१.५९ टक्के वाढ दिसून आली असून १ वर्षात ९३.५० टक्के वाढ दिसून आली आहे. तीन वर्षांत, या शेअरने ११९.५१ टक्के परतावा दिला आहे.