putchi maternity : "गरज ही शोधाची जननी आहे" ही म्हण खरी ठरवत, तामिळनाडूतील एका जोडप्याने आपल्या वैयक्तिक गरजेतून आज कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय उभा केला आहे. कोइम्बतूर येथील दीपिका आणि तिचा पती त्यागराजन यांनी केवळ ६०,००० च्या गुंतवणुकीतून 'पुची' (Puchi) नावाचा मॅटरनिटी फॅशन ब्रँड सुरू केला. विशेष म्हणजे, अवघ्या तीन वर्षांत या ब्रँडने ५ कोटी रुपयांची उलाढाल केली आहे.
व्यवसायाची कल्पना कशी सुचली?
त्यागराजन हे बी.टेक आणि एमबीए पदवीधर असून, पूर्वी ते ऑस्ट्रेलियात रिअल इस्टेट क्षेत्रात काम करत होते. २०२० मध्ये जेव्हा त्यांची पत्नी दीपिका गर्भवती होती, तेव्हा तिला गरोदरपणात स्टायलिश आणि आरामदायी प्रसूती कपडे शोधण्यात खूप अडचणी येत होत्या. बाजारात अशा कपड्यांची मोठी कमतरता असल्याचे तिला जाणवले. याच अनुभवातून दीपिकाला मॅटरनिटी फॅशन ब्रँड सुरू करण्याची कल्पना सुचली.
'पुची' ब्रँडचा जन्म आणि विस्तार
दीपिकाच्या मुलाचे नाव अभिमन्यू आहे, ज्याला ती प्रेमाने 'पुची' म्हणते. याच नावावरून तिने आपल्या ब्रँडला 'पुची' असे नाव दिले आणि ६०,००० रुपयांच्या अल्प गुंतवणुकीतून तो सुरू केला. सुरुवातीला दीपिकाने स्वतः १० फीडिंग ड्रेसेस तयार केले आणि स्थानिक कारागिरांकडून कपडे शिवून घेतले. २०२० मध्ये तिने इंस्टाग्रामवर आपल्या उत्पादनांना लाँच केले आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर तिने शॉपिफाय (Shopify) नावाच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर स्वतःची वेबसाइट सुरू केली.
'पुची' ब्रँड आता केवळ मॅटरनिटी आणि फीडिंग ड्रेसेसपुरता मर्यादित नाही. तो मॅटरनिटी ड्रेसेस, फीडिंग कुर्ता, बाळासाठी आवश्यक वस्तू, खेळणी, सॅनिटरी पॅड्स, इंटिमेट वेअर, बंप सपोर्ट पॅन्ट्स, नर्सिंग ब्रा आणि नर्सिंग फ्रेंडली कफ्तान्स अशा विविध उत्पादनांची ऑफर देतो.
वाचा - मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
भागीदारीतून व्यवसाय वाढवला
२०२३ मध्ये, दीपिका आणि त्यागराजन यांनी त्यांच्या उत्पादनांची विक्री वाढवण्यासाठी १०० इतर भारतीय मदर-बेबी ब्रँडचा समावेश केला. यामुळे 'पुची'ला २० ते ३० टक्के कमिशनही मिळाले. सुरुवातीला दीपिकाने ५०० चौरस फूट भाड्याने घेतलेल्या दुकानातून उत्पादने विकायला सुरुवात केली असली तरी, तिची बहुतेक विक्री ऑनलाइनच होती. आज, 'पुची' ब्रँड ९०० हून अधिक स्टाईल ऑफर करतो, त्यापैकी ४० टक्के उत्पादने त्यांची स्वतःची आहेत. एका छोट्या गरजेतून सुरू झालेला हा व्यवसाय आज लाखो महिलांसाठी एक महत्त्वाचा आधार बनला आहे.