लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: केंद्र सरकारकडून वस्तू व सेवा कर (जीएसटी) व्यवस्थेत मोठे बदल करण्याची तयारी सुरू झाली आहे. सरकार आपला महत्त्वाकांक्षी जीएसटी सुधारणा आराखडा पुढे नेताना इलेक्ट्रिक वाहनांवर (ईव्ही) केवळ ५ टक्के कर लावण्याचा प्रस्ताव ठेवणार आहे. लोण्यापासून इलेक्ट्रॉनिक्सपर्यंतच्या दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील कर दर कमी करण्याचा विचार असलेल्या या सुधारणा आराखड्याचा विचार करण्यासाठी जीएसटी परिषद बुधवारपासून दोन दिवसांच्या बैठकीस प्रारंभ करणार आहे.
स्वस्त होणाऱ्या वस्तू
तूप, सुका मेवा, २० लिटर पिण्याचे पाणी नमकीन, काही पादत्राणे व कपडे, औषधे व वैद्यकीय उपकरणे, पेन्सिली, सायकली, छत्र्या, हेअर पिन, टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रिज, एंट्री-लेव्हल कार, इलेक्ट्रिक वाहने
महाग होणाऱ्या वस्तू
एसयूव्ही, लक्झरी कार्स, तंबाखू, पान, मसाला, सिगारेटवर ४० टक्के टॅक्स.
ग्राहकांना दिलासा कसा?
- ई-वाहनांवर ५ टक्के कर लावण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडून मांडण्यात येणार आहे. सरकारच्या मते या निर्णयामुळे ई-वाहन क्षेत्राला स्थैर्य मिळेल, तर राज्यांना करातून स्थिर उत्पन्नही उपलब्ध राहील.
- बटरपासून इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत दैनंदिन वापरातील अनेक वस्तूंवरील करदर कमी झाल्यास त्यांच्या किमती खाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
- काही इलेक्ट्रॉनिक वस्तू जसे टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रिज यांच्यावरचा कर सध्या २८ टक्के आहे, तो कमी करून १८% केल्यास त्यांच्या किमतीत घट होण्याची शक्यता आहे.