मुंबई : टाटा समूहाच्या निवृत्ती धोरणाला बाजुला सारून, टाटा सन्सचे विद्यमान अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना तिसरा कार्यकाळ देण्यास टाटा ट्रस्टने मान्यता दिली आहे. ही मंजुरी औपचारिकरीत्या टाटा सन्सकडे विचारार्थ सादर करण्यात येणार आहे. सध्या चंद्रशेखरन यांचा दुसरा पाच वर्षाचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२७ मध्ये संपणार आहे. या निर्णयामुळे प्रथमच टाटा समूहात एखादा अधिकारी निवृत्तीवयानंतरही पूर्ण कार्यकारी जबाबदारी सांभाळणार आहे.
नेतृत्व सातत्यासाठी प्रस्ताव -
टाटा समूह सध्या ज्या महत्त्वाच्या व्यावसायिक परिवर्तनातून जात आहे, त्या पार्श्वभूमीवर नेतृत्व सातत्य राखणे आवश्यक असल्याचे नोएल टाटा आणि वेणू श्रीनिवासन यांनी म्हटले. हा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर झाला. नियमांनुसार, कोणत्याही अधिकाऱ्याचा नवा कार्यकाळ विद्यमान कार्यकाळ संपण्याच्या एक वर्ष आधी मंजूर केला जातो.
जबरदस्त आर्थिक कामगिरी
एन. चंद्रशेखरन यांनी ऑक्टोबर २०१६ मध्ये टाटा सन्सच्या संचालक मंडळात प्रवेश केला आणि जानेवारी २०१७ मध्ये अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.
त्यांच्या नेतृत्वात टाटा समूहाने महसूल जवळजवळ दुप्पट केला, निव्वळ नफा तीन पट वाढवला आणि ५.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली.
समूहाचा विस्तार, नवे क्षेत्र
२०२४-२५ या आर्थिक वर्षात टाटा समूहाचा एकूण महसूल १५.३४ लाख कोटी रुपये, तर निव्वळ नफा १.१३ लाख कोटी रुपये इतका झाला. मात्र, मागील वर्षभरात समूहाच्या बाजारमूल्यात सुमारे ६.९ लाख कोटींची घट झाली, ज्याचे प्रमुख कारण टीसीएस आहे.