Pan-Aadhaar Linking Deadline: जर तुम्ही अद्याप तुमचं पॅन कार्ड आधारशी लिंक केलं नसेल, तर तुमच्याकडे ते करण्याची ही शेवटची संधी आहे. आयकर विभागाच्या माहितीनुसार, पॅन-आधार लिंकिंगची मुदत ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपत आहे. आता तुमच्याकडे १० दिवसांपेक्षाही कमी वेळ शिल्लक आहे. जर तुम्ही ही डेडलाईन चुकवली, तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचे पॅन कार्ड 'इनऑपरेटिव्ह' म्हणजेच निष्क्रिय होईल. याचा थेट परिणाम तुमच्या बँक व्यवहारांवर, शेअर बाजार गुंतवणुकीवर आणि इनकम टॅक्स रिटर्नवर होईल. १,००० रुपये दंडासह तुम्ही ही प्रक्रिया आता पूर्ण करू शकता.
पॅन-आधार लिंकिंगची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२५ जवळ येत आहे. आयकर विभागाच्या अधिसूचनेनुसार, ज्या लोकांना १ ऑक्टोबर २०२४ पूर्वी आधार कार्डच्या आधारे पॅन कार्ड वाटप करण्यात आलं होतं, त्यांच्यासाठी या वर्षाच्या अखेरीपर्यंत लिंकिंग करणं अनिवार्य आहे. जर ही प्रक्रिया वेळेत पूर्ण केली नाही, तर तुमचं पॅन कार्ड पूर्णपणे निष्क्रिय होईल. सध्या लिंकिंगची मूळ मुदत उलटून गेल्यामुळे, ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला १,००० रुपये दंड देखील भरावा लागणार आहे.
२५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
व्यवहारांवर होणारे गंभीर परिणाम
पॅन कार्ड निष्क्रिय होण्याचे परिणाम अत्यंत गंभीर असू शकतात. एकदा कार्ड 'इनऑपरेटिव्ह' झाले की, तुम्ही नवीन बँक खातं उघडू शकणार नाही किंवा क्रेडिट आणि डेबिट कार्डही बनवू शकणार नाही. याशिवाय, ५०,००० रुपयांपेक्षा जास्त रोख जमा करणं आणि १०,००० रुपयांपेक्षा जास्त बँकिंग व्यवहारांमध्ये मोठी अडचण येईल. म्युच्युअल फंड आणि स्टॉकब्रोकर देखील तुमची सेवा निलंबित करू शकतात, ज्यामुळे तुमची गुंतवणूक अडकून पडू शकते.
करासंबंधी अडचणी आणि टीडीएसचा फटका
निष्क्रिय पॅनमुळे तुम्ही तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) फाईल करू शकणार नाही. जर तुम्ही तो फाईल केला तरी विभाग तो फेटाळू शकतो. इतकंच नाही तर, तुम्हाला अत्यंत उच्च दरानं TDS/TCS चा भरणा करावा लागेल. तुम्ही भरलेल्या कराचं क्रेडिट 'फॉर्म 26AS' मध्ये दिसणार नाही आणि तुम्हाला TDS/TCS प्रमाणपत्र मिळवण्यातही समस्या येईल. थोडक्यात सांगायचं तर, करविषयक लाभ आणि रिफंडची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प होऊ शकते.
लिंक करण्याची सोपी पद्धत
लिंकिंगसाठी तुम्हाला आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर जावे लागेल. सर्वात आधी 'Quick Links' मध्ये जाऊन 'Link Aadhaar' हा पर्याय निवडा आणि १,००० रुपयांचा दंड भरा. पेमेंट पडताळणीनंतर काही दिवसांनी पोर्टलवर पुन्हा जाऊन आपली आधार आणि पॅनची माहिती नोंदवा. ओटीपी व्हेरिफिकेशननंतर तुमची विनंती सबमिट होईल. लक्षात ठेवा की, आधार आणि पॅन कार्डवरील नाव आणि जन्मतारीख यांसारखी माहिती सारखीच असावी, जेणेकरून पडताळणीमध्ये कोणताही अडथळा येणार नाही.
