Mahindra & Mahindra Rare Earth Magnet: भारतातील इलेक्ट्रिक वाहने (EVs) आणि हाय-टेक उपकरणांच्या भविष्यासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. देशातील सुप्रसिद्ध ऑटो कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) आणि आघाडीची ऑटो कंपोनंट उत्पादक कंपनी युनो मिंडा (Uno Minda) आता भारतात रेअर अर्थ मॅग्नेट तयार करण्याची योजना आखत आहेत. हे तेच मॅग्नेट आहेत जे इलेक्ट्रिक मोटर्स, डिफेन्स सिस्टीम आणि इलेक्ट्रॉनिक्ससाठी खूप महत्वाचे आहेत. काय आहे त्यांचा प्लान जाणून घेऊ.
सध्या जगातील ९०% रेअर अर्थ मॅग्नेट चीनमधून येतात. परंतु, एप्रिल २०२५ मध्ये, चीननं त्यांच्या निर्यातीवर बंदी घालून जगभरातील कंपन्यांना मोठा धक्का दिला. अमेरिका आणि युरोपला पुरवठा आता पुन्हा सुरू झाला आहे, परंतु भारत अजूनही मंजुरीची वाट पाहत आहे. यामुळेच मोदी सरकार 'आत्मनिर्भर भारता'च्या दिशेनं आणखी एक मोठे पाऊल उचलणार आहे. रेअर अर्थ मॅग्नेट्सचे देशांतर्गत उत्पादन आता भारतात शक्य होऊ शकतं. बिझनेस स्टँडर्डनं यासंदर्भातील वृत्त दिलंय.
LIC मधील स्टेक विकण्याच्या तयारीत सरकार; किती राहणार हिस्सा, खासगी कंपनी बनणार?
महिंद्रा आणि Uno मिंडाचा पुढाकार
सरकारी सूत्रांनुसार, अवजड उद्योग मंत्रालयासोबत अलिकडेच झालेल्या बैठकीत महिंद्रानं देशांतर्गत उत्पादनात रस दाखवला आहे. कंपनी देशांतर्गत उत्पादकांसोबत भागीदारी किंवा दीर्घकालीन पुरवठा करार करण्यास देखील तयार आहे.
महिंद्राने नुकतीच दोन नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच केल्या आहेत आणि आता त्यांना त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी रेअर अर्थ मॅग्नेट्सचा स्थिर पुरवठा सुनिश्चित करायचा आहे. त्याचबरोबर युनो मिंडादेखील या दिशेनं पावलं उचलत आहे, जेणेकरून भारताच्या उद्योगाला चिनी अवलंबित्वापासून मुक्ती मिळू शकेल.
रेअर अर्थ मॅग्नेट्स इतके महत्वाचे का?
हे चुंबक इलेक्ट्रिक वाहन मोटर्स, स्मार्टफोन, कम्प्युटर्स, एमआरआय मशीन आणि अगदी क्षेपणास्त्र प्रणालीमध्ये देखील वापरले जातात. ईव्ही उद्योगासाठी हे हृदयाच्या ठोक्यासारखे आहेत. चीनचा पुरवठा ठप्प झाल्याने संपूर्ण वाहन क्षेत्राला फटका बसू शकतो.
भारतात उत्पादन कधी सुरू होणार?
पूर्णपणे स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्याला एक-दोन वर्षे लागू शकतात, परंतु आपल्याला आताच याची सुरुवात करावी लागेल. या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार अनुदान आणि प्रोत्साहन योजनांवरही काम करत आहे.