Coldrif Cough Syrup: देशाच्या विविध भागांमध्ये लहान मुलांचा बळी घेणाऱ्या कोल्ड्रिफ कफ सिरपची विक्री थांबवण्यात आली आहे. हे कफ सिरप श्रीसन फार्मास्युटिकल (Sresan Pharmaceutical) कंपनी बनवते, जी चेन्नई (तमिळनाडू) येथे स्थित आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थानसह अन्य राज्यांमध्ये ११ हून अधिक मुलांच्या मृत्यूनंतर तमिळनाडू सरकारनं या कंपनीला बंद केलं आहे. विशेष म्हणजे, या कंपनीची गेल्या १६ वर्षांपासून एकही वार्षिक सर्वसाधारण बैठक (AGM) झालेली नव्हती.
१९९० मध्ये सुरू झालेली कंपनी
मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेयर्सच्या (MCA) वेबसाइटवर या कंपनीशी संबंधित माहिती आणि कागदपत्रं उपलब्ध आहेत. एमसीएनुसार, कंपनीचं पूर्ण नाव श्रीसन फार्मास्युटिकल्स लिमिटेड आहे. ही कंपनी २५ ऑक्टोबर १९९० रोजी सुरू झाली. तिचा नोंदणीकृत पत्ता चेन्नईचा आहे आणि ती स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध नाही. कंपनीच्या संचालकाचं नाव रंगनाथन गोविंदराजन आहे.
१५३ रुपयांवर लिस्ट झाला हा स्वस्त IPO; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ९०%चा फायदा, झाले मालामाल
१६ वर्षांपासून एजीएम नाही, बॅलन्स शीटही नाही
कंपन्या दरवर्षी आपली वार्षिक सर्वसाधारण बैठक (AGM) घेतात, ज्यामध्ये नवीन योजना, महसूल, नफा आणि इतर कामांची माहिती दिली जाते. परंतु आश्चर्यकारक बाब म्हणजे, या कंपनीची १६ वर्षांपासून एकही एजीएम झाली नव्हती. एमसीए वेबसाइटवरील माहितीनुसार, कंपनीची शेवटची एजीएम २९ सप्टेंबर २००९ रोजी झाली होती. नवभारत टाईम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलंय.
एजीएम न होण्यासोबतच, कंपनीनं आपली बॅलन्स शीट संबंधित माहिती देखील एमसीएला दिली नाही. एमसीएच्या वेबसाइटनुसार, कंपनीची बॅलन्स शीट ३१ मार्च २००९ नंतर अपडेट केलेली नाही. ही माहिती कंपनीचा मोठा निष्काळजीपणा दर्शवते.
कंपनीचा अंदाजित महसूल
ही कंपनी केवळ कफ सिरपच नव्हे, तर इतरही अनेक उत्पादने विकते. कंपनीचा महसूल आणि नफा याबद्दल वेगवेगळ्या अहवालांमध्ये वेगवेगळी माहिती देण्यात आली आहे. इंडियामार्ट वेबसाइटनुसार, कंपनीचं वार्षिक टर्नओव्हर १.५ ते ५ कोटी रुपये आहे.
सिरपमध्ये आढळले विषारी रसायन
मुलांच्या मृत्यूनंतर हे कफ सिरप वादात आलं आहे. सिरपच्या तपासणीत, त्यामध्ये ४८ टक्क्यांहून अधिक डायएथिलीन ग्लायकॉल (Diethylene Glycol) नावाचं विषारी रसायन आढळलं आहे. मुलांच्या मृत्यूनंतर कंपनीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आलाय आणि या सिरपच्या विक्रीवर अनेक राज्यांमध्ये बंदी घालण्यात आली आहे.