नवी दिल्ली : तुम्ही सिगारेट ओढत असाल तर १ फेब्रुवारी २०२६ पासून तुमचा सिगारेटचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. सिगारेटवर पुन्हा एकदा उत्पादन शुल्क स्वतंत्रपणे लावण्यात येणार असल्यामुळे किमती वाढतील. ही वाढ फक्त ब्रँडवर नव्हे, तर सिगारेटची लांबी किती आहे यावर अवलंबून असेल.
केंद्र सरकारने सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादनांवरील कररचनेत मोठा बदल केला आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच जीएसटी व्यतिरिक्त स्वतंत्र उत्पादन शुल्क (एक्साईज ड्यूटी) पुन्हा लागू करण्यात आले आहे.
किमतीत नेमकी किती वाढ होणार?
नव्या दरांनुसार, उत्पादन शुल्क २,०५० ते ८,५०० रुपये प्रति १,००० सिगारेट इतके असेल. म्हणजेच सिगारेट जितकी लांब, तितका कर जास्त. छोट्या सिगारेटवरील शुल्कात प्रति कांडी सुमारे २ रुपये वाढ होईल, तर लांब व प्रीमियम सिगारेटवर ५ रुपयांपेक्षा जास्त वाढ संभवते.
