Cigarette, Tobacco Price: केंद्र सरकारनं सिगरेट, पान मसाला आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांवरील कराबाबत (Tax on Tobacco) वर्षाच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबर २०२५ रोजी महत्त्वाची घोषणा केली आहे. सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, १ फेब्रुवारीपासून तंबाखू उत्पादनांवर अतिरिक्त एक्साईज ड्युटी (Additional Excise Duty) लावली जाईल आणि पान मसाल्यावर नवीन सेस लावला जाईल.
तंबाखू आणि पान मसाल्यावरील नवीन कर जीएसटी (GST) दराव्यतिरिक्त असतील आणि ते सध्या अशा हानिकारक वस्तूंवर लावल्या जाणाऱ्या कम्पेन्सेशन सेसची (Compensation Cess) जागा घेतील.
तंबाखू उत्पादनांवर आता किती कर?
सरकारी अधिसूचनेनुसार, १ फेब्रुवारीपासून पान मसाला, सिगरेट, तंबाखू आणि तत्सम उत्पादनांवर ४०% जीएसटी लागेल, तर विडीवर १८% वस्तू आणि सेवा कर (GST) लागेल. संसदेने डिसेंबरमध्ये दोन विधेयकं मंजूर केली होती, ज्यामध्ये पान मसाला उत्पादनावर नवीन आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा सेस लावण्याची आणि तंबाखूवर एक्ससाईज ड्युटी लावण्याची परवानगी देण्यात आली होती.
सरकारनं बुधवारी हे कर लागू करण्याची तारीख १ फेब्रुवारी निश्चित केली. सध्याचा जीएसटी कॉम्पन्सेशन सेस, जो आता वेगवेगळ्या दराने लावला जातो, तो १ फेब्रुवारीपासून बंद होईल.
तंबाखू उत्पादनांवर ५३% कर
भारतात सिगरेटवरील एकूण कर सध्या किरकोळ किमतीच्या साधारणपणे ५३% आहे, जो जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) ७५% बेंचमार्कपेक्षा खूपच कमी आहे, ज्याचा उद्देश खप कमी करणं हा आहे. यामध्ये २८% वस्तू आणि सेवा कर आणि सिगरेटच्या आकारावर आधारित अतिरिक्त व्हॅल्यू बेस्ड लेव्हीचा समावेश आहे.
