लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : केंद्र सरकारने तंबाखूजन्य पदार्थांवरील उत्पादन शुल्कात अभूतपूर्व वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने सिगरेटच्या किमतीत मोठी वाढ होणार आहे. मात्र, या निर्णयामुळे सिगरेटच्या अवैध व्यापारात (तस्करी) वाढ होऊन सरकारला मोठ्या महसुली नुकसानीला सामोरे जावे लागू शकते, असा इशारा अर्थतज्ज्ञांनी दिला आहे.
कराचा भार ७० टक्क्यांवर !
१ फेब्रुवारीपासून सिगरेटच्या लांबीनुसार प्रती १,००० सिगरेट्सवर २,०५० रुपयांपासून ८,५०० रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे कराचा भार ६०-७० टक्क्यांपर्यंत जाईल.
तस्करीचे मोठे संकट
‘थिंक चेंज फोरम’चे रंगनाथ तन्नीरु यांच्या मते, कर वाढल्याने सिगरेट महाग होईल, पण त्यामुळे लोकांचे व्यसन सुटण्याऐवजी ते स्वस्त आणि अवैध उत्पादनांकडे वळतील. सध्या भारताच्या एकूण तंबाखू बाजारपेठेत अवैध उत्पादनांचा वाटा २६ टक्के आहे. तस्करीच्या बाबतीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे.
