China Economic Crisis : भारताला कायम लाल डोळे दाखवणाऱ्या शेजारी राष्ट्र ड्रॅगनचा फुगा अखेर फुटला आहे. जवळपास ३ दशके जागतिक अर्थव्यवस्थेवर दबदबा निर्माण करणारी चीन आता बॅकफूटवर आली आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या या देशाची अर्थव्यवस्था सध्या अनेक आघाड्यांवर संघर्ष करत आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी चीन सरकारने नुकतेच एक मोठे प्रोत्साहन पॅकेज जाहीर केले होते. परंतु, त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. चीनमधील १० वर्षांच्या बहुसंख्य सरकारी रोख्यांचे उत्पन्न २% पेक्षा कमी झाले आहे. चीनच्या इतिहासात असे प्रथमच घडले आहे. गेल्या ४ वर्षांत त्यात १३० बेसिस पॉइंट्सने घट झाली आहे.
चीनची अर्थव्यवस्था गेल्या काही दशकांतील सर्वात मोठ्या मंदीतून जात आहे. देशातील घरांच्या किमती शिखरावरून 80 टक्क्यांनी घसरल्या आहेत. रिअल इस्टेटचे संकट २०२१ मध्ये सुरू झाले असून त्याचा परिणाम इतर क्षेत्रांवरही होऊ लागला. चीनच्या जीडीपीमध्ये रिअल इस्टेट क्षेत्राचा वाटा सुमारे एक तृतीयांश आहे. हे क्षेत्र बुडाल्याने आता बँकाही बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे. देशातील ग्राहकांच्या मागणी घटली आहे. लोक पैसे खर्च करण्याऐवजी बचत करण्यात व्यस्त आहेत.
पाच तिमाहींसाठी चलनवाढ
चीनमध्ये गेल्या ५ तिमाहींपासून चलनवाढीची (डिफ्लेशन) परिस्थिती आहे, जी १९९० च्या दशकानंतरचा सर्वात मोठा प्रभाव आहे. वस्तू आणि सेवांच्या किमती कमी होण्याला चलनवाढ म्हणतात. हे महागाईच्या उलट आहे. अर्थव्यवस्थेतील निधी आणि पतपुरवठा कमी झाल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवते. चीनमधील लोक पैसे खर्च करण्याऐवजी बचत करण्यात व्यस्त आहेत. यामुळेच चीनची अर्थव्यवस्था जपानप्रमाणेच ठप्प होण्याची भीती आहे.
दरम्यान, अमेरिकेत नुकत्याच झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामुळे चीनसोबतचा तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी यापूर्वीच चिनी वस्तूंवर आयात शुल्क वाढवण्याची घोषणा केली आहे. अलीकडेच ब्रिक्स देशांवर १०० टक्के शुल्क लागू करण्याचाही इशारा दिला आहे. जर ट्रम्प आपल्या भूमिकेवर ठाम राहिले तर चिनी ड्रॅगन आणखी अडचणीत येऊ शकतो.