China America Tariff War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी नुकतीच जेव्हा भेट घेतली, तेव्हा जगभरात सर्वांना वाटलं होतं की आता दोन्ही देशांमध्ये परिस्थिती सुधारेल. मात्र, ही चर्चा संपून काहीच दिवस झालेत आणि पुन्हा एकदा दोघांमध्ये तणाव सुरू झाला आहे. चीनने आपल्या कंपन्यांना देशांतर्गत चिप्स वापरण्याचे निर्देश जारी केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बिथरले आणि त्यांनी जगातील सर्वात मोठी चिप उत्पादक कंपनी एनविडियाला (NVIDIA) एआय (AI) आधारित चिप्सची निर्यात चीनला बंद करण्याचे कडक आदेश दिले आहेत.
स्वदेशी चिप्सचा आग्रह आणि ट्रम्प यांची प्रतिक्रिया
ट्रम्प आणि जिनपिंग यांनी नुकतेच व्यापार कराराला अंतिम रूप देण्यासाठी एकत्र भेट घेतली होती. त्यांनी हस्तांदोलन केलं तेव्हा गोष्टी ठीक होतील असं वाटलं होत. परंतु, चीननं नुकताच एक आदेश जारी केला, ज्यामध्ये त्यांनी देशातील कंपन्यांना स्वदेशी चिप्स वापरण्यावर भर देण्याचे निर्देश दिले. या कृतीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष संतप्त झाले आणि त्यांनी चिप्स बनवणाऱ्या एनविडिया कंपनीला आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित चिप्सचा पुरवठा चीनला न करण्याचे निर्देश दिले.
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
एनविडियाची चीनला पुरवठा करण्याची तयारी
रॉयटर्स वृत्तसंस्थेने या प्रकरणातील जाणकारांच्या हवाल्याने सांगितले की, एनविडियानं तिच्या अनेक चिनी ग्राहकांना एआय-आधारित चिप B30A चे नमुने पाठवले होते आणि त्याचा पुरवठा करण्याची तयारीही दर्शवली होती. आता बातमी आली आहे की व्हाईट हाऊसने सर्व फेडरल एजन्सींना कळवलंय की, ते एनविडियाच्या एआय चिप्स चीनमध्ये विकण्याची परवानगी देणार नाहीत. या चिपचा उपयोग मोठ्या एआय मॉडेलच्या भाषेला (लँग्वेज) समजून घेण्यासाठी आणि ती प्रसारित करण्यासाठी केला जातो.
पहिले चीनने दिला झटका
चीनच्या सरकारनं यापूर्वीच एनविडियाविरुद्ध नियामक (रेग्युलेटरी) चौकशी सुरू केली आहे आणि तिच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यानंतर त्यांनी नुकत्याच घेतलेल्या निर्णयामध्ये, सरकारी अनुदानावर चालणाऱ्या सर्व डेटा सेंटर प्रकल्पांना केवळ देशांतर्गत कंपन्यांनी विकसित केलेल्या चिप्स वापरण्याचे कडक निर्देश दिले आहेत. इतकंच नाही, तर ज्या डेटा सेंटरचे बांधकाम ३० टक्के पूर्ण झाले आहे, त्यांनाही विदेशी चिप्स काढून टाकण्याचे आणि त्यांचे ऑर्डर रद्द करण्याचे निर्देश देण्यात आलेत. चीनच्या या निर्णयाचा एनविडियासह इतर अमेरिकन चिप उत्पादक कंपन्यांवरही परिणाम होणार आहे.
आता अमेरिकेनं चीनला दिला झटका
अमेरिकेकडून चीनला दरवर्षी मोठ्या प्रमाणात चिप्सची निर्यात होते. २०२३ मध्ये हा आकडा सुमारे १४ अब्ज डॉलरच्या आसपास होता. चीनमधील अनेक कंपन्यांना अमेरिकेच्या चिप्सची गरज भासते. विशेषतः एनविडियाकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात चिप्सचा पुरवठा चीनमध्ये होतो. मात्र, चीनच्या ताज्या निर्णयांमुळे व्हाईट हाऊसनं जे आदेश दिले आहेत, त्याचा अमेरिकेच्या निर्यातीवर परिणाम होणार आहे. साहजिकच, यामुळे चीनमधील कंपन्याही नक्कीच प्रभावित होतील. तथापि, एनविडियानं ट्रम्प यांच्या निर्बंधांपासून वाचण्यासाठी आपल्या एआय चिप मॉडेल B30A मध्ये बदल करण्याची तयारी दर्शवल्याची बातमी आहे.
