LIC Scheme: मुलांच्या भविष्यासाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल, तर भारतीय जीवन विमा निगम (LIC) ची ‘अमृत बाल’ योजना एक उत्तम पर्याय ठरू शकते. ही पॉलिसी मुलांच्या शिक्षण, करिअर आणि विवाहासाठी आर्थिक सुरक्षा देतानाच पालकांच्या बचतीवर चांगला परतावादेखील देते.
काय आहे LIC अमृत बाल योजना?
LIC ‘अमृत बाल’ ही नॉन-लिंक्ड लाइफ इन्शुरन्स पॉलिसी आहे, जी खासकरून मुलांच्या भविष्याचा विचार करून तयार करण्यात आली आहे. या योजनेत पालक आपल्या मुलाच्या नावाने गुंतवणूक करू शकतात आणि त्याबदल्यात विमा संरक्षणासोबत आकर्षक परतावा मिळतो. म्हणजेच काय तर, एकाच पॉलिसीत संरक्षण आणि बचत दोन्ही सुविधा मिळतात.
या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी मुलाचे वय किमान 30 दिवस आणि जास्तीत जास्त 13 वर्षे असावे लागते. पॉलिसीची मुदत अशी ठेवली जाते की, ती मुलगा/मुलगी 18 ते 25 वर्षांच्या वयोगटात पोहोचल्यावर मॅच्युअर होते, ज्यामुळे त्या वेळी शिक्षण, कॉलेज फी किंवा करिअरच्या खर्चाची पूर्तता सहज होऊ शकते.
प्रीमियम आणि गुंतवणुकीचे पर्याय
या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, प्रीमियम भरण्याची लवचिकता. पॉलिसीधारक मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक हप्त्यांमध्ये प्रीमियम भरू शकतात. त्याशिवाय, सिंगल प्रीमियम किंवा मर्यादित कालावधी (5, 6 किंवा 7 वर्षे) या स्वरूपातही गुंतवणूक करता येते.
या योजनेतील किमान विमा रक्कम ₹2 लाख आहे, मात्र कमाल मर्यादा नाही. म्हणजे पालक आपल्या क्षमतेनुसार जास्त गुंतवणूक करू शकतात. ऑनलाइन खरेदी केल्यास प्रीमियमवर सवलतही मिळते.
परताव्याची हमी
या पॉलिसीमध्ये प्रत्येक वर्षी ₹80 प्रति हजार विमा रक्कम या दराने गारंटीड अॅडिशन मिळते, म्हणजे पॉलिसी चालू ठेवली, तर दरवर्षी निश्चित वाढ मिळते. जर मुलाचे वय पॉलिसी घेताना 8 वर्षांपेक्षा कमी असेल, तर जोखीम कवच दोन वर्षांनी किंवा पॉलिसीच्या वार्षिकतादिनी सुरू होते. त्यामुळे पालकांच्या अनुपस्थितीतही बाळाचे भविष्य सुरक्षित राहते.
प्रीमियम वेव्हर रायडर आणि कर्ज सुविधा
या योजनेत Premium Waiver Benefit Rider चा पर्याय आहे. म्हणजेच, जर पालक कोणत्याही कारणाने प्रीमियम भरू शकले नाहीत, तरीही पॉलिसी चालू राहते. तसेच, पॉलिसीवर गरज पडल्यास कर्जाची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे.
का आहे ही योजना पालकांसाठी सर्वोत्तम?
LIC ‘अमृत बाल’ योजना अशा पालकांसाठी खास आहे, जे आपल्या मुलांच्या शिक्षण, करिअर किंवा लग्नासाठी दीर्घकालीन आर्थिक सुरक्षितता शोधत आहेत. एफडी किंवा आरडी सारख्या पारंपरिक योजनांपेक्षा ही पॉलिसी जास्त परतावा, हमी असलेली वाढ आणि विमा संरक्षण देऊन अधिक फायदेशीर ठरते. ही योजना म्हणजे फक्त बचत नव्हे, तर आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची आर्थिक हमी आहे.
(टीप- कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)
