लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : दैनंदिन आवश्यक वस्तू आणि खाद्यपदार्थ आदींचच्या किंमती कमी झाल्यामुळे महागाई कमी झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने बुधवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिलमध्ये घाऊक महागाई १३ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर ०.८५ टक्क्यांवर आली आहे.
मार्चमध्ये महागाई २.०५ % इतकी होती. तर यापूर्वी मार्च २०२४ मध्ये महागाई ०.५३% वर होती. त्याचबरोबर फेब्रुवारी २०२५ च्या महागाई दराची सुधारित आकडेवारी सरकारने जाहीर केली आहे. ही आकडेवारी २.३८% वरून वाढवून २.४५% इतकी केली आहे. घाऊक महागाई दीर्घकाळ जास्त राहिल्यास बहुतेक उत्पादन क्षेत्रांवर त्याचा वाईट परिणाम होतो.
दैनंदिन आवश्यक वस्तूंची (प्रायमरी आर्टिकल्स) महागाई ०.७६% वरून घटून १.४४% झाली आहे.
खाद्यपदार्थांची महागाई (फूड इंडेक्स) ४.६६% वरून घटून २.५५% झाली.
इंधन, वीज यांचा घाऊक महागाई दर ०.२०% वरून घटून २.१८% वर आला.
उत्पादन वस्तूंचा घाऊक महागाई दर ३.०७% वरून घटून २.६२% इतका झाला आहे.
पीक उत्पादनात २०% वाढ
कृषी मंत्रालयाच्या अंदाजानुसार गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पिकांच्या उत्पादनात सुमारे २० टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याने देशांतर्गत पुरवठा पुरेसा राहील. ३ ते ४ महिन्यांत बटाटा, कांदा व इतर भाज्यांच्या किमती वाढणार नाहीत.
२०२४-२५ मध्ये एकूण बागायती उत्पादन सुमारे ३६२०.९० लाख टन होण्याचा अंदाज आहे. जे गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे २ टक्के (सुमारे ७३.४२ लाख टन) जास्त आहे.
कांद्याच्या पेरणीत २.८२ लाख हेक्टरची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ९.७६ लाख हेक्टरमध्ये कांद्याची लागवड झाली होती, जी यंदा १२.५८ लाख हेक्टरपेक्षा अधिक झाली आहे. बटाटा पेरणीचे क्षेत्र १९.५६ लाख हेक्टरवरून २०.०३ लाख हेक्टर झाले. उत्पादनही वाढण्याची अपेक्षा आहे.