Bonus For Government Employees: सणासुदीच्या हंगामापूर्वी केंद्र सरकारनं आपल्या कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारनं ग्रुप C आणि गैर-राजपत्रित ग्रुप B कर्मचाऱ्यांसाठी प्रोडक्टिव्हीटी लिंक्ड बोनस (Productivity Linked Bonus) म्हणून ३० दिवसांच्या वेतनाएवढा ॲड-हॉक बोनस देण्याची घोषणा केली आहे. अर्थ मंत्रालयाने सोमवारी आदेश जारी करत सांगितलं की, २०२४-२५ या वर्षासाठी बोनसची रक्कम ₹६,९०८ निश्चित करण्यात आली आहे.
कोणाकोणाला मिळणार लाभ?
हा बोनस त्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी आहे जे ३१ मार्च २०२५ पर्यंत सेवेत होते आणि ज्यांनी किमान सलग सहा महिने काम केलं आहे.
ज्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण वर्ष काम केलं नसेल, त्यांना प्रो-राटा आधारावर (म्हणजे जितके महिने काम केलं आहे, त्यानुसार) बोनस दिला जाईल.
केंद्रीय निमलष्करी दल (Central Armed Police Forces) आणि सशस्त्र दलांचे पात्र कर्मचारी देखील या बोनसच्या कक्षेत येतील.
केंद्रशासित प्रदेशांचे (UTs) ते कर्मचारी जे केंद्र सरकारच्या वेतन रचनेवर काम करतात आणि जे इतर कोणत्याही बोनस किंवा एक्स-ग्रेशियासाठी पात्र नाहीत, त्यांनाही हा लाभ मिळेल.
ॲड-हॉक कर्मचारी, ज्यांच्या सेवेत कोणताही खंड (ब्रेक) नाही, ते देखील पात्र असतील.
कॅज्युअल लेबरर, ज्यांनी मागील तीन वर्षांत निर्धारित दिवसांपर्यंत काम केलं आहे, त्यांनाही बोनस दिला जाईल. यांच्या बोनसची रक्कम ₹१,१८४ निश्चित करण्यात आली आहे.
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
इतर महत्त्वाच्या बाबी
फक्त तेच कर्मचारी पात्र असतील, जे ३१ मार्च २०२५ पर्यंत सेवेत कायम होते.
जे कर्मचारी या तारखेपूर्वी निवृत्त (रिटायर), राजीनामा किंवा निधन झाल्यामुळे सेवेतून बाहेर पडले, त्यांच्यापैकी केवळ तेच पात्र असतील ज्यांनी किमान सहा महिन्यांची सेवा पूर्ण केली आहे.
जे कर्मचारी प्रतिनियुक्तीवर (डेप्युटेशन) अन्य संस्थांमध्ये कार्यरत आहेत, त्यांना बोनस त्यांच्या सध्याच्या संस्थेद्वारे दिला जाईल.
बोनसची रक्कम नेहमीच जवळच्या रुपयांपर्यंत पूर्णांकित केली जाईल.
बोनसची गणना कशी होणार?
बोनसची गणना जास्तीत जास्त ₹७,००० मासिक वेतनावर केली जाईल.
उदाहरणार्थ: ₹७,००० × ३० ÷ ३०.४ = ₹६,९०७.८९ (जी ₹६,९०८ पर्यंत पूर्णांक करण्यात आली आहे).
सरकारचा हा निर्णय लाखो केंद्रीय कर्मचारी आणि सुरक्षा दलाच्या जवानांना थेट फायदा पोहोचवेल. या सणासुदीच्या बोनसमुळे त्यांच्या कुटुंबांना मोठी मदत आणि आनंद मिळण्याची अपेक्षा आहे.