Canara Bank Mis-Selling Case : तुमचा बँकेच्या मॅनेजरवर किंवा कर्मचाऱ्यावर डोळे झाकून विश्वास असेल, तर नागपूरमधील ही घटना तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. कॅनरा बँकेच्या एका शाखेने ९० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाला 'टारगेट' बनवून त्यांच्या आयुष्यभराची कमाई हडपण्याचा धक्कादायक प्रयत्न केला. ९० वर्षांच्या वृद्धाला चक्क ९९ वर्षांनंतर म्हणजे सन २१२४ मध्ये मॅच्युअर होणारी विमा पॉलिसी विकून बँकेने 'मिस-सेलिंग'चा (चुकीच्या पद्धतीने विक्री) कळस गाठला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
नागपूरमधील वेंकटचलम वी. अय्यर हे गेल्या अनेक दशकांपासून कॅनरा बँकेचे निष्ठावान ग्राहक आहेत. त्यांच्या विश्वासाचा फायदा घेत शाखा व्यवस्थापकाने त्यांना २ लाख रुपये वार्षिक प्रीमियम असलेली एक लाइफ इन्शुरन्स पॉलिसी गळी उतरवली. ९० वर्षांच्या व्यक्तीला विमा मिळणे कठीण असल्याने मॅनेजरने एक 'मास्टर प्लॅन' आखला. आजोबांना त्यांच्या मुलीसोबत जॉइंट अकाउंट उघडायला लावले. पॉलिसीमध्ये मुलीला 'लाईफ अश्युअर्ड' (विमाधारक) केले आणि वार्षिक २ लाखांचा हप्ता ९० वर्षांच्या वडिलांच्या खात्यातून कापला. ही पॉलिसी १०० वर्षांनंतर म्हणजे २१२४ मध्ये मॅच्युअर होणार होती. ९० वर्षांच्या व्यक्तीला ९९ वर्षांनंतर मिळणाऱ्या लाभाचे स्वप्न दाखवून लुटण्याचा हा प्रकार समोर आला आहे.
सोशल मीडियामुळे प्रकरण उजेडात
अय्यर यांच्या नातेवाईकाने (साकेत आर.) 'X' वर ही पोस्ट शेअर केल्यानंतर हा संतापजनक प्रकार जगासमोर आला. गेल्या वर्षी फेब्रुवारीत पहिली हप्ता कापला गेला, मात्र दुसऱ्या हप्त्यासाठी बँकेचा फोन आल्यावर आजोबा घाबरले आणि त्यांनी कुटुंबाला ही माहिती दिली. हा प्रकार व्हायरल होताच नेटिझन्सनी कॅनरा बँक आणि IRDAI च्या नियमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
प्रकरणावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न
सुरुवातीला बँकेने सोशल मीडियावर कोरडे उत्तर देऊन प्रकरणावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाढता दबाव आणि संताप पाहून बँकेचे प्रादेशिक प्रमुख आणि शाखा व्यवस्थापक रविवारी सुटीच्या दिवशी आजोबांच्या घरी पोहोचले. त्यांनी या प्रकरणाचे तातडीने निराकरण करण्याचे आणि एका आठवड्यात पूर्ण रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले आहे.
वाचा - कंपन्यांनी ७.५ लाखांपर्यंत पीएफ भरला तर 'नो टॅक्स'! केंद्र सरकारचा पीएफ धारकांसाठी मोठा निर्णय
बँक विमा खरेदी करताना 'या' गोष्टी तपासा
- बँक कर्मचारी त्यांचे विक्रीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 'गुंतवणूक' म्हणून विमा पॉलिसी विकतात.
- पॉलिसी किती वर्षांची आहे आणि पैसे कधी परत मिळणार आहेत, हे कागदपत्रांवर स्वतः तपासा.
- कोणत्याही कोऱ्या अर्जावर किंवा न समजलेल्या कागदावर स्वाक्षरी करू नका.
- मोठा आर्थिक व्यवहार करताना कुटुंबातील विश्वासू व्यक्तीला सोबत ठेवा.
