HRA Home Loan: होय, तुम्हाला एचआरए आणि होम लोनवरील व्याजाची सवलत दोन्ही घेता येतात. तुम्ही ज्या घरात राहता ते भाड्याचे असेल तर तुम्हाला एचआरएची वजावट मिळते. त्याचवेळी जर तुम्ही स्वतःचे घर विकत घेतले आणि ते घर तुम्ही भाड्याने दिले, तर त्या घरावर घेतलेल्या कर्जावरील व्याजाची वजावट घेता येते.
एचआरएसाठी नियम अगदी सोपा आहे – तुम्ही प्रत्यक्षात भाडे भरत आहात आणि ते घर तुमच्या मालकीचे नाही, तर एचआरए मिळतो. त्यामुळे तुम्ही दुसरे घर विकत घेतले तरी, जर त्यात स्वतः राहिला नाहीत आणि ते भाड्याने दिले, तर एचआरए घेण्यात काही अडचण येत नाही. मात्र, हे फक्त जुन्या करपद्धतीतच शक्य आहे.
होम लोनच्या व्याजाची वजावट ही घर स्वतः राहण्यासाठी आहे का भाड्याने दिले आहे यावर अवलंबून असते. जर घरात तुम्हीच राहात असाल, तर जास्तीत जास्त २ लाख रुपयांपर्यंत व्याज वजावट घेता येते. पण जर ते घर भाड्याने दिले असेल, तर भरलेले संपूर्ण व्याज वजावट म्हणून दाखवता येते. मात्र इतर उत्पन्नाशी समायोजन करण्याची मर्यादा २ लाख रुपये आहे. उरलेले नुकसान पुढील आठ वर्षे पुढे नेऊन फक्त घराच्या उत्पन्नाशी ॲडजस्ट करता येते.
नवीन करपद्धतीत एचआरएची वजावट मिळत नाही आणि स्वतः राहिलेल्या घरावर व्याजाची वजावटही मिळत नाही. म्हणूनच तुम्ही भाड्याच्या घरात राहता म्हणून एचआरए मिळत राहील. तुम्ही विकत घेतलेले घर भाड्याने दिल्यास त्यावरील व्याजाची वजावटही घेता येईल. त्यामुळे एचआरए आणि होम लोनवरील सवलत दोन्ही मिळतील, पण फक्त जुनी करपद्धती निवडल्यास.