Home Loan, Card Loan News: घर आणि कार खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आता दिलासा देणारी बातमी समोर आलीये. काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेनं रेपो दर कमी केल्यानंतर आता काही बँका आपला व्याजदर कमी करत आहेत. कॅनरा बँक आणि इंडियन बँक या देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकांनी आपल्या कर्जाच्या दरात कपात करण्याची घोषणा केलीये. रिझर्व्ह बँकेनं नुकताच रेपो दर ६.२५ टक्क्यांवरून ६.०० टक्क्यांवर आणला आहे.
कॅनरा बँकेनं आपल्या रेपो लिंक्ड लेंडिंग रेटमध्ये (आरएलएलआर) २५ बेसिस पॉईंट्सची कपात केली आहे, जी १२ एप्रिल २०२५ पासून लागू झाली आहे. आता या बँकेतील गृहकर्जाचा व्याजदर वार्षिक ७.९० टक्क्यांपासून सुरू झालाय, तर वाहन कर्जाचा वार्षिक ८.२० टक्क्यांपासून सुरू होणार आहे. या बदलामुळे ग्राहकांचा ईएमआय कमी होईल आणि नवीन कर्जदारांना तो परवडणारा पर्याय बनेल, असं बँकेचं म्हणणं आहे.
त्याचप्रमाणे इंडियन बँकेनंही गृहकर्जाचा व्याजदर ८.१५ टक्क्यांवरून ७.९० टक्के आणि वाहन कर्जाचा व्याजदर ८.५० टक्क्यांवरून ८.२५ टक्क्यांवर आणला आहे. विशेष म्हणजे इंडियन बँक आता प्रोसेसिंग फी आणि डॉक्युमेंटेशन चार्जेस न घेता डिस्काऊंट देत आहे, ज्यामुळे ग्राहकांना अतिरिक्त दिलासा मिळणार आहे.
कर्जदारांना मिळणार दिलासा
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) आपला एक्सटर्नल बेंचमार्क बेस्ड लेंडिंग रेट (EBLR) ८.९०% वरून ८.६५% पर्यंत कमी केला आहे. पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ इंडियानंही आरएलएलआर आणि आरबीएलआरमध्ये अनुक्रमे ०.२५ टक्के कपात केली आहे. बँक ऑफ इंडियानं ९ एप्रिल २०२५ पासून हे नवे दर लागू केले आहेत. या कपातीमुळे कर्ज मिळणे पूर्वीपेक्षा सोपं होईल, असं तज्ज्ञांचे मत आहे. विशेषत: मध्यमवर्गीय आणि पहिल्यांदाच घर किंवा कार खरेदी करणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. तसंच यामुळे ऑटो आणि रिअल इस्टेट क्षेत्राला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.