BMC Election 2026 : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा रणसंग्राम सुरू झाला असून उद्या, १५ जानेवारी रोजी मतदान पार पडणार आहे. या सर्व निवडणुकांमध्ये संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे ते म्हणजे मुंबई महानगरपालिकेवर. मुंबईची सत्ता म्हणजे केवळ महापालिकेवरचा ताबा नाही, तर आशियातील सर्वात मोठ्या आर्थिक तिजोरीची चावी आहे. ठाकरे गट, शिंदे गट आणि भाजप यांच्यातील या 'मल्टिस्टारर' राजकीय लढाईत 'बीएमसी'च्या अफाट संपत्तीची चर्चा सध्या रंगली आहे.
राज्यांपेक्षाही मोठी 'श्रीमंती'!
मुंबई महानगरपालिकेचे वार्षिक बजेट ७४,४२७ कोटी रुपये आहे. हे बजेट ऐकून थक्क व्हायला होते, कारण भारतातील अनेक राज्यांचे एकूण बजेटही मुंबईच्या तुलनेत अर्धेच आहे.
तुलनात्मक आकडेवारी (२०२५-२६)
- मुंबई महानगरपालिका : ७४,४२७ कोटी रुपये
- रुणाचल प्रदेश : ३९,८४२ कोटी रुपये
- मणिपूर : ३५,१०३ कोटी रुपये
- त्रिपुरा : ३२,४२३ कोटी रुपये
- लडाख : ४,६९२ कोटी रुपये
- धक्कादायक बाब म्हणजे, मुंबई महापालिकेचे बजेट जगातील ५० पेक्षा जास्त देशांच्या एकूण जीडीपीपेक्षा जास्त आहे.
८०,००० कोटींच्या 'एफडी'वर डोळा?
बीएमसीकडे केवळ चालू बजेटच मोठे नाही, तर त्यांच्याकडे सुमारे ८०,००० कोटी रुपयांच्या मुदत ठेवी आहेत. एवढी मोठी रोकड देशातील इतर कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेकडे नाही. या आर्थिक ताकदीमुळेच कोस्टल रोड, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प यांसारखे हजारो कोटींचे प्रकल्प राबवण्यासाठी मुंबईला केंद्र किंवा राज्य सरकारकडे मदतीचा हात पसरवावा लागत नाही.
कमाईचा 'मलाईदार' स्त्रोत
मुंबई महानगरपालिकेला 'मलाईदार' पालिका का म्हणतात? याची उत्तरे तिच्या कमाईच्या साधनांमध्ये दडली आहेत. मुंबईतील रिअल इस्टेटमधील घडामोडींमुळे बिल्डरांकडून मिळणारे प्रीमियम हे उत्पन्नाचे सर्वात मोठे साधन आहे. मुंबईतील लाखो मालमत्तांमधून मिळणारा मालमत्ता कर. जकात बंद झाल्यानंतर सरकारकडून मिळणारा जीएसटी परतावा.
इतर महापालिकांच्या तुलनेत मुंबई 'किंग'
| महानगरपालिका | बजेट (अंदाजे कोटीत) |
| मुंबई | ७४,००० कोटी रुपये |
| पिंपरी-चिंचवड | ९,५०० कोटी रुपये |
| नवी मुंबई | ५,७०० कोटी रुपये |
| ठाणे | ५,६०० कोटी रुपये |
| पुणे | ११,००० कोटी रुपये (अंदाजे) |
२२७ जागा आणि राजकीय अस्तित्वाची लढाई
ठाकरे घराण्याने गेल्या २० वर्षांहून अधिक काळ बीएमसीवर एकछत्री अंमल गाजवला आहे. मात्र, यंदाची निवडणूक वेगळी आहे. २२७ जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप आमने-सामने आहेत. बीएमसीची स्वतःची रुग्णालये, मेडिकल कॉलेजेस, फायर ब्रिगेड आणि स्वतःच्या मालकीची धरणे (तलाव) आहेत, ज्यामुळे ही सत्ता गमावणे कोणत्याही पक्षाला परवडणारे नाही.
