Bloomberg Billionaire List: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी या दोघांनाही मंगळवारी मोठा धक्का बसला. 'ब्लूमबर्ग बिलेनियर लिस्ट'मध्ये मंगळवारी हे दोन्ही दिग्गज सर्वात जास्त नुकसान सोसणारे (Top Losers) ठरले. मस्क यांची संपत्ती १३.४८ अब्ज डॉलरनं कमी झाली, तर मुकेश अंबानी यांच्या नेटवर्थमध्ये ४.३७ अब्ज डॉलरची घट झाली आहे. दुसरीकडे, गौतम अदानी यांनी ३१३ मिलियन डॉलर गमावले असून ८५.४ अब्ज डॉलरसह ते टॉप-२० च्या बाहेर पडले आहेत. अंबानींकडे सध्या १०३ अब्ज डॉलरची संपत्ती आहे.
संपत्तीत घट होण्याचं कारण
इलॉन मस्क यांची कंपनी 'टेस्ला'च्या शेअर्समध्ये मंगळवारी ४ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. मस्क यांच्या संपत्तीचा मोठा हिस्सा टेस्लाच्या शेअर्समधून येतो, त्यामुळे त्यांच्या संपत्तीत मोठी घट नोंदवली गेली. त्याचप्रमाणे, मुकेश अंबानी यांच्या 'रिलायन्स इंडस्ट्रीज'च्या शेअर्समध्येही ४ टक्क्यांहून अधिक घसरण झाल्यानं त्यांच्या संपत्तीत घसरण झाली. मात्र, या घसरणीचा त्यांच्या रँकिंगवर कोणताही परिणाम झालेला नाही. मुकेश अंबानी ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्समध्ये १८ व्या स्थानावर कायम आहेत, तर मस्क पहिल्या क्रमांकावर आहेत.
इतर श्रीमंतांच्या संपत्तीतील चढ-उतार
जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती लॅरी पेज यांना १.८० अब्ज डॉलरचा फटका बसला असून त्यांची संपत्ती आता २७० अब्ज डॉलर्स झाली आहे. याउलट, तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या जेफ बेझोस यांना ७.१८ अब्ज डॉलरचा फायदा झाला, ज्यामुळे त्यांची संपत्ती २६२ अब्ज डॉलरवर पोहोचली. सर्गेई ब्रिन यांना १.६४ अब्ज डॉलरचं नुकसान झालं असून २५१ अब्ज डॉलरसह ते चौथ्या क्रमांकावर आहेत. पाचव्या क्रमांकावर असलेल्या लॅरी एलिसन यांना ५७६ मिलियन डॉलर्सचा फायदा झाला असून त्यांची संपत्ती २४६ अब्ज डॉलर आहे.
टॉप-१० श्रीमंतांची सद्यस्थिती
- मार्क झुकरबर्ग: श्रीमंतांच्या यादीत आता सहाव्या स्थानावर आहेत. त्यांच्या संपत्तीत ६७७ मिलियन डॉलरची वाढ झाली असून एकूण संपत्ती २३३ अब्ज डॉलर झाली आहे.
- बर्नार्ड अर्नाल्ट: फ्रान्सचे बर्नार्ड अर्नाल्ट सातव्या क्रमांकावर असून त्यांची संपत्ती २२ मिलियन डॉलरनं कमी २०७ अब्ज डॉलर झाली आहे.
- स्टीव्ह बालमर: यांना १.८३ अब्ज डॉलरचा फायदा झाला असून त्यांची संपत्ती १६७ अब्ज डॉलर आहे.
- जेन्सन हुआंग: १५५ अब्ज डॉलरसह ते ९ व्या स्थानावर आहेत. त्यांना ६८६ मिलियन डॉलरचे नुकसान झाले आहे.
- वॉरेन बफे: १० व्या स्थानावर असून त्यांची एकूण संपत्ती ८२.२ दशलक्ष डॉलरनं वाढून १५० अब्ज डॉलर झाली आहे.
