दरवर्षी अमेरिकेत 'थँक्सगिव्हिंग डे'नंतर येणारा शुक्रवार आता जगभरात 'ब्लॅक फ्रायडे सेल' म्हणून ओळखला जातो. या दिवशी ई-कॉमर्स कंपन्यांसह किरकोळ विक्रेते ग्राहकांना प्रचंड सूट आणि आकर्षक ऑफर्स देतात. परंतु, या खरेदीच्या उत्सवाला 'ब्लॅक फ्रायडे' हे 'काळे' विशेषण का जोडले गेले, यामागे एक रंजक इतिहास आहे.
१९६० च्या दशकात अमेरिकेतील फिलाडेल्फिया शहरात 'थँक्सगिव्हिंग'नंतर लगेच ख्रिसमसच्या खरेदीसाठी लोक रस्त्यावर उतरत असत. यामुळे शहरात प्रचंड वाहतूक कोंडी, गर्दी आणि अफरातफरी निर्माण व्हायची. या अत्यंत त्रासदायक आणि थकाऊ दिवसाचे वर्णन करण्यासाठी फिलाडेल्फियाच्या वाहतूक पोलिसांनी या दिवसाला 'ब्लॅक फ्रायडे' म्हणायला सुरुवात केली.
पोलिसांसाठी हा वाईट दिवस असला तरी दुकानदारांसाठी तो चांगला दिवस होता. यामुळे १९८० च्या दशकात किरकोळ विक्रेत्यांनी या शब्दाला सकारात्मक अर्थ दिला. पूर्वी हिशोब ठेवताना, व्यवसायात झालेल्या नुकसानीची नोंद 'लाल' शाईने आणि नफ्याची नोंद 'काळ्या' शाईने करण्याची पद्धत होती. वर्षभर त्यांचे खाते लाल रंगात दिसत असले तरी त्या एका दिवसाच्या प्रचंड विक्रीमुळे ते नफ्यात म्हणजेच काळ्या शाईत लिहिले जात आहे. हा दिवस त्यांच्यासाठी खरेदीचा धमाका होता. यामुळे हा दिवस ब्लॅक फ्रायडे म्हणून ओळखला जातो.
गेल्या काही वर्षांपासून Amazon, Flipkart सारख्या कंपन्यांनी भारतातही ब्लॅक फ्रायडे सेल सुरु केला आहे. इतर भारतीय कंपन्या देखील या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन आणि गॅझेट्सवर मोठी सूट देत असतात. यामुळे भारतीयांमध्येही 'ब्लॅक फ्रायडे'ची क्रेझ वाढत चालली आहे.
