भारतीय अब्जाधीशांसाठी २०२५ हे वर्ष चढ-उतारांचे राहिलं आहे. काही दिग्गजांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली, तर काहींना नुकसानीचा सामना करावा लागला. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी यावर्षी सर्वाधिक कमाई केली. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, अंबानींच्या संपत्तीत सुमारे १६.५० अब्ज डॉलरची भर पडली. रिलायन्सच्या शेअर्समध्ये झालेली ३० टक्क्यांची वाढ ही २०२० नंतरची सर्वात मोठी वाढ ठरली आहे. रिफायनिंगमधील चांगला नफा, टेलिकॉम टॅरिफमधील वाढ आणि रिटेल व्यवसायाची उत्तम कामगिरी यामुळे त्यांच्या संपत्तीत ही मोठी वाढ झाली आहे.
लक्ष्मी मित्तल, सुनील मित्तल आणि गौतम अदानी यांची प्रगती
मुकेश अंबानी यांच्यानंतर आर्सेलर मित्तलचे चेअरमन लक्ष्मी मित्तल यांनी मोठी कमाई केली. २०२५ मध्ये त्यांच्या संपत्तीत १२ अब्ज डॉलरची वाढ होऊन ती ३१ अब्ज डॉलरवर पोहोचली असून ते जगातील ७० वे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. टेलिकॉम क्षेत्रातील दिग्गज सुनील मित्तल यांच्या संपत्तीत ६ अब्ज डॉलरची भर पडली असून त्यांची एकूण संपत्ती २९ अब्ज डॉलर झाली आहे. एअरटेलच्या शेअरमध्ये ३१ टक्क्यांची वाढ आणि नफ्यातील ८९ टक्क्यांची वाढ त्यांच्यासाठी फायदेशीर ठरली. तसेच, अदानी समूहाचे संस्थापक गौतम अदानी यांनी आपल्या संपत्तीत ५.९ अब्ज डॉलरची भर घातली, ज्यामुळे त्यांची एकूण संपत्ती ८४ अब्ज डॉलर झाली आहे. सेबीने हिंडनबर्ग प्रकरणात दिलेली क्लीन चिट अदानींच्या पथ्यावर पडली असून ते भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती कायम आहेत.
सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; Silver ₹३९७३ नं घसरली, Gold किती झालं स्वस्त? पटापट पाहा रेट्स
बिर्ला, कोटक आणि इतर यशस्वी उद्योजक
आदित्य बिर्ला समूहाचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला यांच्या संपत्तीत ४ अब्ज डॉलरची वाढ होऊन ती २२ अब्ज डॉलर झाली आहे. कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांनीही २ अब्ज डॉलरपेक्षा जास्त कमाई केली असून १६ अब्ज डॉलरच्या नेटवर्थसह त्यांनी भारतातील टॉप १० श्रीमंतांमध्ये स्थान मिळवले आहे. याशिवाय, आयशर मोटर्सचे विक्रम लाल, वाडिया समूहाचे नुस्ली वाडिया, इंडिगोचे सह-संस्थापक राहुल भाटिया आणि टोरंट समूहाचे समीर मेहता यांनीही आपली स्थिती मजबूत ठेवली आहे.
शिव नादर आणि प्रेमजींच्या संपत्तीत घट
एकीकडे अनेक अब्जाधीशांची संपत्ती वाढली असताना, आयटी क्षेत्रातील दिग्गजांना मात्र मोठं नुकसान सोसावं लागलं. एचसीएल टेकचे संस्थापक शिव नादर यांना सर्वाधिक फटका बसला असून त्यांच्या संपत्तीत सुमारे ४ अब्ज डॉलरची घट झाली आहे. आयटी शेअर्समधील विदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे एचसीएलचे शेअर १५ टक्क्यांनी घसरले. विप्रोचे माजी चेअरमन अझीम प्रेमजी यांची संपत्तीही ३ अब्ज डॉलरनं घसरुन २८ अब्ज डॉलर झाली आहे. यावर्षी विप्रोचे शेअर्स १२ टक्क्यांनी कोसळले आहेत.
रिअल इस्टेट आणि फार्मा क्षेत्रातील नुकसान
रिअल इस्टेट क्षेत्रातील दिग्गज आणि डीएलएफचे संस्थापक के.पी. सिंह यांची संपत्ती ३.३८ अब्ज डॉलरनं घसरुन १४ अब्ज डॉलरवर आली आहे, कारण डीएलएफचे शेअर्स १७ टक्क्यांनी घसरले. सन फार्माचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप शांघवी यांच्या संपत्तीत ४ अब्ज डॉलरहून अधिक घट होऊन ती २५.५ अब्ज डॉलर झाली आहे. तसंच, वरुण बेव्हरेजेसचे रवी जयपूरिया यांच्या संपत्तीतही १३ अब्ज डॉलरपर्यंत मोठी घट नोंदवण्यात आली आहे.
