नवी दिल्ली: महागाईच्या काळात सर्वसामान्यांसाठी थोडी दिलासा देणारी बातमी आली आहे. प्रसिद्ध रेटिंग एजन्सी क्रिसीलने जाहीर केलेल्या अहवालानुसार, ऑक्टोबर २०२५ मध्ये शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या थाळींच्या खर्चामध्ये घसरण झाली आहे. सणासुदीच्या काळात खाण्या-पिण्याच्या वस्तूंच्या किमती कमी झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शाकाहारी थाळीची किंमत ८ टक्क्यांनी कमी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ऑक्टोबर २०२५ मध्ये शाकाहारी थाळीची किंमत 27.8 रुपये प्रति थाळी इतकी होती. तर मांसाहारी थाळीच्या किमतीत १२ टक्क्यांनी घट झाली आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये मांसाहारी थाळीची किंमत 54.4 रुपये प्रति थाळी इतकी होती. यंदाच्या सप्टेंबरमध्ये ती 56 रुपये होती.
क्रिसीलच्या अहवालानुसार, टोमॅटो आणि कांद्याच्या किमतीत झालेली मोठी घट हे शाकाहारी थाळी स्वस्त होण्यामागील प्रमुख कारण आहे. टोमॅटोच्या किमतीमध्ये ४० टक्क्यांनी घट झाली. तर कांद्याच्या दरात ५१ टक्क्यांनी घट झाली आहे. तसेच बटाट्याच्या दरात ३१ टक्के कपात झाली आहे. तर मांसाहारी थाळीची किंमत कमी होण्याचे कारण पोल्ट्री उत्पादनांच्या किमतीत झालेली २ टक्क्यांची घट हे आहे. जेवणाच्या थाळीसाठी लागणाऱ्या गोष्टी जरी स्वस्त झाल्या असल्या तरी मागील वर्षाच्या तुलनेत महागाईचा दबाव कायम आहे. वर्षाच्या आधारावर तेलाची किंमत ११ टक्के आणि गॅस सिलिंडरची किंमत ६ टक्क्यांनी वाढलेली आहे. मांसाहारी थाळीत चिकनची ५०टक्के आणि व्हेज थाळीच कांदा, टॉमेटोचा २४ टक्के खर्च असतो.
