टाटा समूहातील उत्तराधिकार आणि नेतृत्वाच्या पुढील फळीला घेऊन एक मोठं पाऊल उचललं गेलं आहे. सीएनबीसी-टीव्ही१८ च्या बातमीनुसार, नोएल टाटा यांचे पुत्र नेव्हिल टाटा यांची सर दोराबजी टाटा ट्रस्टचे विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मेहली मिस्त्री यांना संचालक पदावरून हटवल्यानंतर मंगळवार, ११ नोव्हेंबर रोजी झालेल्या टाटा ट्रस्ट्सच्या बोर्ड बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नेव्हिल टाटा सध्या टाटा समूहाच्या रिटेल सुपरमार्केट चेन स्टार बाजारचे प्रमुख आहेत. यासोबतच त्यांनी भारताचा फास्ट-फॅशन ब्रँड झुडियोला यशाच्या शिखरावर पोहोचवलं आहे, ज्याला देशातील रिटेल क्षेत्रातील सर्वात मोठ्या ग्रोथ स्टोरीजपैकी एक मानलं जातं.
दुसरीकडे, टाटा ट्रस्ट्सनं वेणू श्रीनिवासन यांचा कार्यकाळ आजीवन वरून तीन वर्षांपर्यंत कमी केला आहे. महाराष्ट्र सरकारच्या नवीन नियमांनुसार हा बदल करण्यात आला आहे, ज्यात आजीवन विश्वस्तांची संख्या मर्यादित करण्यात आली आहे. नेव्हिल यांच्यासोबत भास्कर भट्ट यांनाही सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या बोर्डात समाविष्ट करण्यात आलं आहे.
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
नेव्हिल टाटा कोण आहेत?
३२ वर्षीय नेव्हिल टाटा बेयस बिझनेस स्कूलचे पदवीधर आहेत. त्यांनी २०१६ मध्ये ट्रेंट लिमिटेड मध्ये पॅकेज्ड फूड्स आणि बेवरेज वर्टिकलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली, पण लवकरच झुडियो ब्रँडची धुरा सांभाळली. ते जेआरडी टाटा ट्रस्ट, टाटा सोशल वेलफेयर ट्रस्ट आणि आरडी टाटा ट्रस्ट च्या बोर्डाचे सदस्य देखील आहेत. लवकरच त्यांची सर रतन टाटा ट्रस्ट मध्येही समावेश होण्याची शक्यता आहे. नेव्हिल आणि त्यांच्या बहिणी माया आणि लिया व्यावसायिक जीवनात खूप लो-प्रोफाइल राहतात. नेव्हिल यांनी २०१९ मध्ये मानसी किर्लोस्कर यांच्याशी विवाह केला होता.
भास्कर भट्ट कोण आहेत?
भट्ट हे आयआयटी मद्रास आणि आयआयएम अहमदाबादचे माजी विद्यार्थी आहेत. ७१ वर्षीय भट्ट यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात गॉदरेज अँड बॉयस मधून केली होती, त्यानंतर ते टाटा वॉच प्रोजेक्टशी जोडले गेले. हाच प्रोजेक्ट पुढे टायटन कंपनी बनला. भट्ट यांनी २००२ ते २०१९ पर्यंत टायटनचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केलं आणि कंपनीला घड्याळांपासून पुढे आयवेअर, ज्वेलरी, फ्रेग्रन्स, ॲक्सेसरिज आणि साड्यांपर्यंत विस्तार दिला. मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार, त्यांच्या कार्यकाळात टायटनचं बाजार भांडवल सुमारे १३ अब्ज डॉलर पर्यंत पोहोचलं होतं.
