Bharat Taxi Service: देशातील ॲप-आधारित टॅक्सी सेवांच्या बाजारपेठेत आता नवीन स्पर्धा सुरू झाली आहे. पंतप्रधानांच्या 'सहकार से समृद्धी' या दृष्टिकोनातून प्रेरित होऊन सुरू करण्यात आलेल्या, देशातील पहिल्या सहकारी मॉडेल-आधारित 'भारत टॅक्सी' (Bharat Taxi) या राईड-हेलिंग ॲपनं मंगळवारी दिल्ली आणि गुजरातमध्ये आपलं पायलट ऑपरेशन सुरू केलं. हे प्लॅटफॉर्म थेट ओला (Ola), उबर (Uber) आणि रॅपिडो (Rapido) सारख्या स्थापित कंपन्यांना आव्हान देण्याची तयारी करत आहे.
'भारत टॅक्सी'चे संचालन सहकार टॅक्सी कोऑपरेटिव्ह लिमिटेड (Sahakar Taxi Cooperative Limited) द्वारे केलं जात आहे, ज्याच्या पाठीशी देशातील ८ प्रमुख सहकारी संस्था जोडलेल्या आहेत. अमूल (Amul), इफको (IFFCO), नाबार्ड (NABARD) आणि एनडीडीबी (NDDB) यांसारख्या महत्त्वाच्या संस्था या प्रकल्पाच्या प्रमुख प्रमोटर आहेत, ज्यामुळे या उपक्रमाला व्यापक पाठिंबा मिळत आहे.
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम
फक्त १० दिवसांत ५१,००० हून अधिक चालकांची नोंद
पायलट प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात दिल्ली आणि गुजरातमध्ये नोंदणी सुरू आहे. केवळ १० दिवसांत ५१,००० हून अधिक ड्रायव्हर्स या ॲपशी जोडले गेले आहेत. दिल्लीतील पायलट ऑपरेशन अंतर्गत सध्या कार, ऑटो आणि बाईक टॅक्सी सेवा सक्रिय करण्यात आल्या आहेत. गुजरातच्या सौराष्ट्र भागातही चालकांचं रजिस्ट्रेशन सुरू आहे. या सहकार मॉडेलचा उद्देश देशभरातील व्यावसायिक वाहन चालकांना खासगी कंपन्यांवरील वाढत्या अवलंबित्वापासून मुक्त करणं आणि त्यांना चांगले आर्थिक पर्याय उपलब्ध करून देणं हा आहे.
'भारत टॅक्सी'ची खास वैशिष्ट्ये कोणती?
चेअरमन जयेन मेहता यांच्या म्हणण्यानुसार, भारत टॅक्सीचे सर्वात आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे त्याचे 'झीरो-कमिशन स्ट्रक्चर' आहे. या मॉडेलमध्ये प्रत्येक राईडची संपूर्ण कमाई थेट ड्रायव्हरला मिळेल. सहकारी संस्थेचा जो काही नफा होईल, तो थेट सभासदांमध्ये म्हणजेच चालकांमध्ये वाटला जाईल. प्लॅटफॉर्म कोणताही हिडन चार्ज किंवा सर्व्हिस चार्ज कापणार नाही. हा मॉडेल सध्याच्या ॲप-आधारित कंपन्यांच्या २०-३०% कमिशन गोळा करण्याच्या प्रणालीपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे आणि चालकांना उत्तम उत्पन्न व आर्थिक सुरक्षेचे आश्वासन देतो.
प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा
भारत टॅक्सी केवळ चालकांसाठीच नव्हे, तर प्रवाशांसाठीही अनेक सुविधा आहेत. या ॲपमध्ये पारदर्शक भाडे प्रणाली, लाईव्ह ट्रॅकिंग, मल्टी लँग्वेज सपोर्ट, २४x७ कस्टमर सपोर्ट, कॅशलेस/कॅश पेमेंटचे पर्याय आणि सुरक्षित प्रवासासाठी दिल्ली पोलिसांशी टाय-अप समाविष्ट आहे. प्रवाशांची सोय वाढवण्यासाठी ॲपला मेट्रो आणि इतर ट्रान्झिट सेवांशी देखील जोडले जात आहे, ज्यामुळे "डोअर-टू-डोअर मोबिलिटी" अधिक सोपी होईल. भारत टॅक्सीच्या यशस्वी पायलट ऑपरेशननंतर, ते हळूहळू राष्ट्रीय स्तरावर लॉन्च केलं जाईल.
