यंदा आतापर्यंत आयकर परताव्यात तब्बल १६% घट झाली आहे. कारण, फसवणूक टाळण्यासाठी एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त रकमेच्या परताव्यांवर सरकारने कडक तपासणी सुरू केली आहे. परताव्यात घट झाल्यामुळे निव्वळ थेट कर संकलन यावर्षी आतापर्यंत ६.३% वाढून जवळपास ११.९ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. सरकार करचोरी आणि चुकीच्या परतावा दाव्यांवर आता आवळा घालत आहे. त्यामुळे जर कोणी जास्त परतावा मागत असेल, तर त्यांना अतिरिक्त तपासणी प्रक्रियेतून जावे लागणार आहे.
सोमवारी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, १ एप्रिल ते १२ ऑक्टोबरदरम्यान थेट कर संकलनात २.४% वाढ झाली असून ते १३.९ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. यात व्यक्तिगत आयकरात झालेली घटही दिसून आली.
एका अधिकाऱ्याने सांगितले की सेंटर फॉर प्रोसेसिंग ऑफ सेंट्रलाइज्ड पेमेंट्समध्ये चुकीचे परतावा दावे रोखण्यासाठी ऑटोमेटेड तपासणी आणि अतिरिक्त जोखमीचे मूल्यमापन तपास (रिस्क-अॅसेसमेंट चेक्स) लावण्यात आले आहेत. त्यामुळे परतावा प्रक्रियेला कधी कधी जास्त वेळ लागू शकतो.
ज्या आयटीआरमध्ये ठराविक रकमेपेक्षा जास्त परतावा मागितला आहे, त्यांची विशेष तपासणी सुरू आहे. ही रक्कम करदात्यांच्या श्रेणीप्रमाणे वेगळी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.