Bank 5 Day Working : जर तुमची बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात असतील, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. बँकांमध्ये '५-डे वीक' (आठवड्यातून केवळ ५ दिवस काम) लागू करण्याच्या मागणीसाठी बँक कर्मचारी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ही मागणी मान्य न झाल्यास २७ जानेवारी २०२६ रोजी देशभरात बँक संप पुकारण्याचा इशारा देण्यात आला आहे. या संपामुळे सलग तीन दिवस बँकिंग सेवा विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली आहे.
सलग ३ दिवस व्यवहार ठप्प होणार?
बँक कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रमुख संघटनांची शिखर संस्था असलेल्या 'युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स'ने हा इशारा दिला आहे. संपाच्या तारखेचे गणित पाहिले तर ग्राहकांसाठी ही मोठी अडचण ठरू शकते.
- २४ जानेवारी : चौथा शनिवार (बँकेला सुट्टी)
- २५ जानेवारी रविवार (साप्ताहिक सुट्टी)
- २६ जानेवारी : प्रजासत्ताक दिन (सार्वजनिक सुट्टी)
- २७ जानेवारी : प्रस्तावित देशव्यापी बँक संप
- जर हा संप झाला, तर शनिवार ते सोमवार असे सलग तीन दिवस बँकांचे दरवाजे बंद राहतील. यामुळे चेक क्लिअरन्स, रोख व्यवहार आणि कर्जविषयक कामांवर मोठा परिणाम होईल.
नेमकी मागणी काय?
सध्या बँक कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी मिळते. मात्र, केंद्र सरकारी कर्मचारी आणि कॉर्पोरेट क्षेत्राप्रमाणेच बँकांमध्येही सर्व शनिवारी सुट्टी देऊन '५ दिवसांचा आठवडा' लागू करावा, अशी कर्मचाऱ्यांची जुनी मागणी आहे. यामुळे कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होईल आणि 'वर्क-लाइफ बॅलन्स' सुधारेल, असा युक्तिवाद युनियनने केला आहे.
सामान्य ग्राहकांवर काय परिणाम होणार?
- रोख रक्कम भरणे किंवा काढणे, पासबुक एन्ट्री आणि ड्राफ्ट बनवणे यांसारखी कामे पूर्णपणे ठप्प होतील.
- जे ग्राहक आजही इंटरनेट बँकिंगऐवजी प्रत्यक्ष बँकेत जाण्यावर अवलंबून आहेत, त्यांची मोठी गैरसोय होईल.
- सुदैवाने यूपीआय, नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग सेवा सुरू राहतील, मात्र तांत्रिक अडचण आल्यास त्याचे निराकरण होण्यास विलंब लागू शकतो.
वाचा - व्हेनेझुएलाच्या संकटात मुकेश अंबानींना मोठी संधी; शेअरने ओलांडला उच्चांक; तज्ज्ञांनी सांगितलं कारण
वाटाघाटींकडे लक्ष
आता सर्वांचे लक्ष सरकार आणि बँक व्यवस्थापनाच्या भूमिकेकडे लागले आहे. जर चर्चेतून काही सकारात्मक मार्ग निघाला, तर हा संप टळू शकतो. मात्र, तोपर्यंत ग्राहकांनी आपल्या आर्थिक व्यवहारांचे नियोजन आधीच करून ठेवणे हिताचे ठरेल.
