Senior Citizen Loan Tips : अनेक ज्येष्ठ नागरिक निवृत्तीनंतर आपल्या दुसऱ्या इनिंगची सुरुवात करतात. काहींना आपल्या आवडीचे काम सुरू करण्यासाठी कंपनी किंवा छोटा व्यवसाय उभा करायचा असतो, तर काही जण घर, गाडी किंवा इतर स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पैशांची जुळवाजुळव करतात. अशा वेळी अनेक ज्येष्ठ नागरिक बँक कर्जाचा विचार करतात.
पण सामान्यतः, निवृत्त झालेल्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारचे कर्ज देताना बँका थोडा हात आखडता घेतात किंवा कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. मात्र, जर तुम्ही काही आवश्यक गोष्टींची काळजी घेतली आणि तुमचा आर्थिक इतिहास मजबूत असेल, तर तुम्हाला कर्ज अगदी सहज मिळू शकते.
निवृत्तीनंतर कर्ज घेण्याचा विचार करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी खालील तीन गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
१. पेन्शन अकाउंट असलेल्या बँकेतूनच अर्ज करा
ज्येष्ठ नागरिकांना कर्ज मिळवताना सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे, तुम्ही ज्या बँकेत तुमचे पेन्शन खाते आहे, त्याच बँकेत कर्जासाठी अर्ज करा. ज्या बँकेत तुमचे पेन्शन जमा होते, त्या बँकेला तुमच्या उत्पन्नाची आणि आर्थिक पार्श्वभूमीची संपूर्ण माहिती असते. बँक तुमच्या नियमित उत्पन्नावर (पेन्शनवर) विश्वास ठेवते आणि त्यामुळे तुमचा कर्ज अर्ज लवकर मंजूर होण्याची शक्यता वाढते.
२. 'को-ॲप्लिकेंट' सोबत घ्या
जर एखाद्या कारणामुळे बँक तुम्हाला कर्ज देण्यास तयार नसेल, तर कर्जासाठी अर्ज करताना तुम्ही तुमच्यासोबत एखाद्या कमी वयाच्या आणि नियमित उत्पन्न असलेल्या व्यक्तीला 'को-ॲप्लिकेंट' (सह-अर्जदार) बनवा. या सह-अर्जदाराचा क्रेडिट स्कोर चांगला असणे आवश्यक आहे. सह-अर्जदारामुळे बँकेला विश्वास मिळतो की, जर ज्येष्ठ नागरिक वेळेवर कर्जाचे हप्ते भरू शकले नाहीत, तरी दुसरा अर्जदार ते हप्ते फेडेल. यामुळे कर्ज मंजूर होण्याचा मार्ग सोपा होतो.
३. कर्ज लहान ठेवा आणि क्रेडिट स्कोर मजबूत ठेवा
कमी रकमेची आणि कमी कालावधीची कर्जे सहज मंजूर करतात. त्यामुळे तुम्ही प्रयत्न केला पाहिजे की, तुमची कर्जाची रक्कम लहान असावी आणि ती कमी मुदतीत फेडण्याची योजना असावी. निवृत्तीनंतरही तुमचा क्रेडिट स्कोर म्हणजेच CIBIL स्कोर ७५० किंवा त्याहून अधिक राखण्याचा प्रयत्न करा. मजबूत क्रेडिट स्कोर हे दर्शवतो की तुमचा आर्थिक व्यवहार चांगला आहे आणि तुम्ही वेळेवर कर्ज फेडता. चांगला क्रेडिट स्कोर असल्यास बँक तुम्हाला त्वरित कर्ज देऊ शकते.
वाचा - सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
या तीन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवून अर्ज केल्यास, निवृत्तीनंतरही तुमच्या गरजांसाठी बँक कर्ज मिळवणे अधिक सोपे होईल.
