Ayushman Card: उपचारांवरील खर्चामुळे अनेकदा कुटुंबाचे कंबरडे मोडते. गरीब किंवा आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांसाठी हा भार आणखी जड ठरतो. या अडचणीवर मात करण्यासाठी सरकारनं आयुष्यमान भारत योजना (Ayushman Bharat Yojana - PM-JAY) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत आयुष्यमान कार्ड मिळते, ज्यामुळे लिस्टेड रुग्णालयांमध्ये उपचार मोफत होतात. मात्र, या कार्डाद्वारे वर्षातून किती वेळा मोफत उपचार घेता येतात? सरकारनं यावर काही मर्यादा घातली आहे का? तसंच, ज्याच्या नावावर कार्ड आहे, त्याच व्यक्तीला ५ लाखांच्या उपचारांची सुविधा मिळते की संपूर्ण कुटुंबाला? या सर्व शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करूया.
आयुष्यमान कार्ड काय आहे?
आयुष्यमान भारत योजना ही विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मदत करण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आली आहे. आता ७० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या वृद्धांचा देखील या योजनेच्या कक्षेत समावेश करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत, प्रत्येक पात्र कुटुंबाला दरवर्षी ₹ ५,००,००० पर्यंतचे आरोग्य कवच मिळते. या कार्डाच्या मदतीने तुम्ही योजनेशी जोडलेल्या सरकारी किंवा खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेऊ शकता.
खूशखबर! ईएमआयचा भार होणार कमी, सामान्यांना मोठा दिलासा, रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात
कुटुंबाला मिळते ५ लाखांच्या उपचारांची सुविधा
आयुष्यमान भारत योजनेंतर्गत, एका कुटुंबाला दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा मिळते. ही मर्यादा केवळ एका व्यक्तीसाठी नसते, तर ती संपूर्ण कुटुंबाला लागू होते. म्हणजेच, जर कुटुंबात चार सदस्य असतील, तर हे ५ लाख रुपयांचे आरोग्य कवच सर्व सदस्यांसाठी मिळून असते.
वर्षातून किती वेळा उपचार करू शकतो?
आयुष्यमान कार्डाद्वारे वर्षातून किती वेळा उपचार करता येतात, याबाबत अनेकदा संभ्रम असतो. याचं उत्तर असे आहे की, जोपर्यंत ५ लाख रुपयांची मर्यादा पूर्ण होत नाही, तोपर्यंत तुम्ही वर्षभरात कितीही वेळा मोफत उपचारांची सुविधा घेऊ शकता. उपचाराचा खर्च ५ लाख रुपये पूर्ण होताच, त्या वर्षी मोफत उपचारांची सुविधा बंद होते.
आपली पात्रता अशी तपासा
आपण या योजनेसाठी पात्र आहात की नाही, हे तपासण्यासाठी खालील प्रक्रिया वापरा:
१. सर्वप्रथम PMJAY च्या अधिकृत वेबसाइट https://pmjay.gov.in/ वर जा.
२. होमपेजवर 'Am I Eligible' हा पर्याय शोधा. हा तुम्हाला टॉप मेनूमध्ये दिसेल आणि याच्यापुढे प्रश्नचिन्हाचे (?) चिन्ह देखील बनवलेले असते. यावर क्लिक करा.
३. राज्य निवडल्यानंतर तुम्हाला कॅटेगरी निवडावी लागेल. तुम्ही ज्या कॅटेगरीद्वारे तुमचे नाव तपासू इच्छिता, ती निवडा. काही राज्ये केवळ रेशन कार्ड नंबरनं तपासण्याची सुविधा देतात, तर काही राज्ये नाव किंवा कुटुंब संख्येनुसार यादी पाहण्याची सुविधा देतात. काही राज्यांमध्ये मोबाईल नंबर, रेशन कार्ड आणि स्वतःचे नाव या पर्यायांद्वारे शोध घेता येतो. तुमच्या राज्याच्या दिलेल्या पर्यायांमधून एक निवडा.
४. यानंतर Search केल्यावर, तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहात की नाही, हे तुम्हाला कळेल. जर तुमचं नाव आयुष्यमान भारत योजनेच्या यादीत समाविष्ट नसेल, तर सर्च रिझल्ट बॉक्समध्ये 'No Result Found' असे लिहून येईल.
याव्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या जवळच्या जन सेवा केंद्राद्वारे सर्व आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून आयुष्यमान भारत योजनेसाठी तुमची पात्रता तपासू शकता.
आयुष्यमान कार्ड असं बनवा
जर तुम्ही आयुष्यमान भारत योजनेसाठी पात्र असाल आणि तुमचं कार्ड अजून बनलं नसेल, तर ते बनवणं आता पूर्वीपेक्षा खूप सोपं झालं आहे. सरकारनं लोकांच्या सोयीसाठी आयुष्यमान कार्ड बनवण्याचे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मार्ग उपलब्ध करून दिले आहेत.
ऑनलाईन पद्धत
जर तुम्हाला मोबाईल किंवा कॉम्प्युटरचा वापर करणं सोपं वाटत असेल, तर तुम्ही घरबसल्याही तुमचे आयुष्यमान कार्ड बनवू शकता. यासाठी तुम्हाला आयुष्यमान भारत योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल किंवा 'आयुष्यमान भारत ॲप' द्वारे अर्ज करावा लागेल. येथे तुम्हाला आधार, मोबाईल नंबर आणि कुटुंबाशी संबंधित मूलभूत माहिती भरावी लागते. पडताळणी पूर्ण होताच कार्ड डाऊनलोडसाठी उपलब्ध होते.
ऑफलाईन पद्धत
ज्या लोकांना ऑनलाईन प्रक्रिया सोयीची वाटत नाही, ते त्यांचे आयुष्यमान कार्ड जवळच्या सीएससी सेंटर (CSC Centre), जन सेवा केंद्र किंवा सामुदायिक आरोग्य केंद्र (CHC) येथे बनवू शकतात. तेथे उपस्थित अधिकारी किंवा 'आयुष्यमान मित्र' तुमची पात्रता तपासतील. जर तुमचे नाव योजनेत नोंदवलेलं असेल, तर आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जाईल आणि थोड्याच वेळात तुमचे आयुष्यमान कार्ड बनून तयार होईल.
उपचारादरम्यान या गोष्टी लक्षात ठेवा
आयुष्यमान कार्डचा वापर करून उपचार घेण्यापूर्वी काही आवश्यक गोष्टींची पडताळणी करणं खूप महत्वाचे आहे, जेणेकरून नंतर कोणतीही अडचण येऊ नये
सर्वप्रथम, तुम्ही ज्या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जात आहात, ते रुग्णालय आयुष्यमान भारत योजनेशी जोडलेलं आहे की नाही, हे तपासा.
- तुमची समस्या किंवा वैद्यकीय प्रक्रिया आयुष्यमानच्या उपचार पॅकेजमध्ये समाविष्ट आहे की नाही, हे देखील जाणून घ्या. यासाठी तुम्ही योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर माहिती पाहू शकता किंवा रुग्णालयात असलेल्या 'आयुष्यमान मित्राला' विचारू शकता.
- याशिवाय एक आणखी महत्त्वाची गोष्ट आहे. तुमचं आयुष्यमान कार्ड सक्रिय असणं आवश्यक आहे. जर कार्ड Inactive किंवा Unverified असेल, तर रुग्णालयात उपचारादरम्यान अडचण येऊ शकते.
