मुंबई - सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचं मुंबईत निधन झाले. शनिवारी आशा भोसले यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मात्र अखेर आज आशाताईंची प्राणज्योत मालवली. आशा भोसले यांच्या निधनानं भारतीय संगीत विश्वास कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. गेल्या ८ दशकांच्या काळात आशा ताईंनी २० हून अधिक भाषांमध्ये १२ हजाराहून अधिक गाणी गायली, जी आजही लोकांच्या मनात अधिराज्य करत आहेत. आशा भोसले या केवळ उत्तम गायिकाच नव्हत्या तर त्यांच्या हातची चवही उत्कृष्ट होती. सुरेल आवाजाने लोकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आशा भोसले यांनी Asha's रेस्टॉरंटच्या माध्यमातून लोकांची पोटपूजाही घडवून आणली.
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
गायनासोबतच यशस्वी उद्योजिका म्हणूनही आशा भोसले यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या स्वयंपाकाच्या आवडीमधून जन्माला आलेली 'Asha’s ही फाईन डायनिंग रेस्टॉरंट साखळी आज जगभरात लोकप्रिय आहे. २००२ मध्ये दुबईतील WAFI City येथे आशाजचं पहिलं रेस्टॉरंट सुरू झालं होते. त्यानंतर कालांतराने पुढे UAE, कुवेत, कतार, बहरीन तसेच यूकेपर्यंत ही रेस्टॉरंट साखळी विस्तारली. विशेष म्हणजे या रेस्टॉरंटची खासियत अशी की याठिकाणी बनलेले अनेक पदार्थ आशाताईंची स्वत:ची रेसेपी आणि मसाल्यांचा वापर करून बनवली जाते. कबाब, बिर्याणी, तंदुरी आणि इतर बरेच पदार्थ ग्राहकांच्या पसंतीस पडतात.
आशा भोसले यांना गायनासोबतच स्वयंपाकाचीही आवड होती. त्या कायम आपल्या घरी स्वत: जेवण बनवून मुलांना खायला द्यायच्या. यातूनच त्यांना रेस्टॉरंट उभारण्याची कल्पना सुचली. आशा ताईंचा मुलगा या रेस्टॉरंटचं कामकाज सांभाळतो. सुरुवातीच्या काळात आशाताईंनी बनवलेली रेसेपी शिकण्यासाठी ६ महिने मुख्य शेफला त्यांच्यासोबत राहावे लागते. रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या लोकांना घरच्या जेवणांची चव आली पाहिजे हा आशाताईंचा कटाक्ष होता. त्यातून दुबईत सुरू झालेले हे रेस्टॉरंट आता जगातील इतर देशांमध्येही पोहचले आहे.
"ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला"
दरम्यान, आशाताईंचा आवाज म्हणजे संगीताचा आत्मा होता. गायनातील बारमाही हिरवा ऋतू आणि भावभावनांचा सुरेल असा महासागर म्हणजे आशाताई. ‘महाराष्ट्र भूषण’सारखा ‘बांगला विभूषण’ पुरस्कारही त्यांना बहाल केला गेला. बदलांना सहजरित्या आत्मसात करणार्या अशा अष्टपैलू गायिका पुन्हा होणे नाही. आपल्या आयुष्यातील बहुतांश काळ अगदी वयाच्या ५-६ वर्षांपासून ते अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी संगीताची सेवा केली. आशाताईंनी शास्त्रीय संगीत तसेच आधुनिक काळातील संगीतही लिलया पेलले. संगीतात जेवढे प्रकार आहेत, शास्त्रीय संगीत असो, पॉप असो, रॉक असो, भावगीत असो, २० पेक्षा जास्त भाषांमध्ये आशाताईंनी गीत गायन केले असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशाताईंना श्रद्धांजली वाहिली.
