न्यूयॉर्क: 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (एआय) येणाऱ्या काळात मानवी श्रमापेक्षा स्वस्त होईल, असा दावा ओपन एआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी केला आहे. 'फोर्ब्स'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी तंत्रज्ञानातील बदलावर भाष्य केले.
ऑल्टमन यांनी सांगितले की, एखादे बौद्धिक काम करण्यासाठी लागणाऱ्या मानवी ऊर्जेच्या तुलनेत एआय मॉडेल्स चालवण्याचा खर्च कमालीचा कमी झाला आहे.
नोकऱ्यांचे काय होणार?
एआयमुळे नोकऱ्या संपतील का? या प्रश्नावर ऑल्टमन म्हणतात की, "कामे संपणार नाहीत. काही कामे पूर्णपणे स्वयंचलित होतील, तर काहींचे स्वरूप बदलेल. काही नवीन निर्माण होतील. उदा. पूर्वी 'यू-ट्यूबर' हे करिअर नव्हते. आता ते एक करिअर आहे. भविष्यातही अशा नवीन संधी निर्माण होतील. मात्र, कोडिंगपेक्षा आता लवचिकता आणि एआय साधनांचा वापर करण्याचे कौशल्य अधिक महत्त्वाचे ठरेल."
भारताची मोठी झेप
भारताचा उल्लेख करताना ऑल्टमन म्हणाले की, एआय स्वीकारण्यात भारत जगात आघाडीवर आहे. ओपन एआयच्या कोडिंग उत्पादनासाठी भारत ही सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ असून लवकरच ती सर्वात मोठी बाजारपेठ ठरू शकते.
शिक्षण पद्धती बदला
विद्यार्थी एआयवर अवलंबून राहिल्याने त्यांची विचार करण्याची क्षमता कमी होईल का, यावर त्यांनी सांगितले की, शोध (सर्च) इंजिन आले तेव्हाही अशीच भीती होती. शिक्षण पद्धतीत बदल करून एआयचा वापर गृहीत धरूनच विद्यार्थ्यांची चिकित्सक विचारशक्ती विकसित करणे हाच यावर उपाय आहे.
