Indian Students Jobs in the US : गेल्या अनेक दशकांपासून अमेरिकेत आपल्या बुद्धिमत्तेचा डंका वाजवणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसमोर आता एक नवे आणि गंभीर संकट उभे ठाकले आहे. 'न्यूयॉर्क टाइम्स'ने प्रसिद्ध केलेल्या एका धक्कादायक अहवालानुसार, अमेरिकेत शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीसाठी मुलाखती देणाऱ्या भारतीय उमेदवारांना एकाच प्रश्नाचा सामना करावा लागत आहे ''तुम्ही अमेरिकन नागरिक आहात का?'' दुर्दैवाने, या प्रश्नानंतर बहुतांश बिगर-अमेरिकन विद्यार्थ्यांचे नोकरीचे दरवाजे बंद होत असल्याचे चित्र समोर आले आहे.
भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत ४४ टक्क्यांची मोठी घट
अमेरिकेतील 'ट्रम्प २.०' प्रशासनाचे बदललेले धोरण आणि व्हिसा प्रक्रियेतील अनिश्चितता यांचा थेट परिणाम भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येवर झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अमेरिकेत जाणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या संख्येत तब्बल ४४ टक्क्यांची मोठी घट नोंदवण्यात आली आहे.
F-1 व्हिसा आणि नोकरीचे गणित
भारतीय विद्यार्थी प्रामुख्याने F-1 व्हिसावर अमेरिकेत शिक्षणासाठी जातात. जोपर्यंत विद्यार्थ्याचा अभ्यासक्रम पूर्ण होत नाही, तोपर्यंत हा व्हिसा वैध राहतो. कोर्स संपल्यानंतर विद्यार्थ्यांना अमेरिकेत राहण्यासाठी फक्त ६० दिवसांचा अवधी मिळतो. त्यानंतर त्यांना देश सोडावा लागतो किंवा नवीन व्हिसासाठी अर्ज करावा लागतो. F-1 व्हिसावर विद्यार्थ्यांना काही अटी व शर्तींनुसार अमेरिकेत नोकरी करण्याची परवानगी असते. मात्र, सध्याच्या धोरणांमुळे ही संधी मिळवणे कठीण झाले आहे.
वाचा - होम लोन घेताय? व्याजाच्या दरापेक्षा 'हे' ८ छुपे चार्जेस ठरू शकतात महाग; दुर्लक्ष केल्यास होईल नुकसान
कौशल्य असून नोकरी नाही
भारतीय-अमेरिकन समुदायाची लोकसंख्या अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ १.५ टक्के आहे. मात्र, तंत्रज्ञान, व्यवसाय, कला, शिक्षण आणि अर्थशास्त्र अशा प्रत्येक क्षेत्रात भारतीयांनी नेतृत्व सिद्ध केले आहे. अनेक आघाड्यांवर भारतीय मूळचे लोक स्थानिक अमेरिकनांपेक्षा सरस कामगिरी करत असूनही, आता नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची बाजारपेठ संकुचित होताना दिसत आहे.
