PNB Loan Fraud: देशात आणखी एक कर्ज घोटाळा उघडकीस आला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेनं (PNB) २७०.५७ कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याची माहिती रिझर्व्ह बँकेला दिली. ओडिशाच्या गुप्ता पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर नावाच्या कंपनीनं हा घोटाळा केल्याची माहिती समोर आलीये. गुप्ता पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला (GDI) कंपनीनं जामीन मंजूर केल्याचं पीएनबीनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटलंय. या फसवणुकीची माहिती रिझर्व्ह बँकेला देण्यात आलीये. गुप्ता पॉवरने भुवनेश्वर येथील बँकेच्या स्टेशन स्क्वेअर शाखेतून हे कर्ज घेतले होतं.
पंजाब नॅशनल बँकेने दिलेल्या माहितीनुसार, विहित निकषांनुसार बँकेनं यापूर्वीच २७०.५७ कोटी रुपयांच्या कर्जाची तरतूद केली आहे. विशेष म्हणजे २०२४ मध्ये देशातील बँक घोटाळ्यांमध्ये २७ टक्क्यांनी वाढ झाली. एप्रिलअखेर संपलेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत बँकिंग फसवणुकीची प्रकरणे १८,४६१ वर पोहोचलीत. गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत अशा प्रकारची १४ हजार ४८० प्रकरणे समोर आली होती. फसवणुकीची रक्कम ८ पटींनी वाढून २१,३६७ कोटी रुपये झाली आहे.
नफा झाला दुप्पट
चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत पीएनबीचा निव्वळ नफा दुपटीनं वाढून ४,५०८ कोटी रुपये झाला. आलोच्य तिमाहीत बँकेचं एकूण उत्पन्न वाढून ३४,७५२ कोटी रुपये झालंय, जे गेल्या वर्षी २०२३-२४ च्या डिसेंबर तिमाहीत २९,९६२ कोटी रुपये होतं. पीएनबीचं जीएनपीए प्रमाण कमी ४.०९ टक्क्यांवर आलंय, जे वर्षभरापूर्वी ६.२४ टक्के होतं.
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतही घोटाळा
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील १२२ कोटी रुपयांचा घोटाळा नुकताच उघडकीस आला. आरबीआयच्या लेखापरीक्षणात बँकेच्या तिजोरीतून १२२ कोटी रुपये गायब असल्याचं उघड झालं होतं. हा घोटाळा बँकेच्या महाव्यवस्थापकांनी केला होता. महाव्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे.