Anil Ambani New Business: अनिल अंबानी आता नव्या व्यवसायात प्रवेश करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर (RInfra) आता रिन्यूएबल एनर्जी म्हणजेच सौर आणि पवन ऊर्जेशी संबंधित उपकरणं बनवणार आहे. यामुळे कंपनीचा व्यवसाय आणखी विस्तारणार आहे. हे नवं काम हाताळण्यासाठी इव्हान साहा आणि मुश्ताक हुसेन यांची सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर आलीये. इव्हान साहा रिन्यूएबल मॅन्युफॅक्चरिंगचे सीईओ असतील. मुश्ताक हुसेन बॅटरी मॅन्युफॅक्चरिंगचे सीईओ असतील.
इकॉनॉमिक टाईम्सनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार आरइन्फ्रा रिन्यूएबल एनर्जी निर्मिती उद्योगात धोरणात्मकरित्या प्रवेश करत आहे. याचाच अर्थ कंपनी एक रणनीती घेऊन या क्षेत्रात येत आहे. कंपनी एक प्रकल्प उभारणार आहे जिथे सौर पॅनेल आणि इतर आवश्यक उपकरणं तयार केली जातील. यामुळे भारतात सोलर पॅनलचं उत्पादन वाढणार आहे.
बॅटरी तयार करण्याचा प्लांटही उभारणार
इव्हान साहा सोलर मॅन्युफॅक्चरिंगची जबाबदारी सांभाळणार आहेत. त्यांना सेमीकंडक्टर आणि सोलर टेक्नॉलॉजीचा ३० वर्षांचा अनुभव आहे. विक्रम हे सोलर आणि रिन्यू पॉवर सारख्या बड्या कंपन्यांमध्ये त्यांनी काम केले आहे.
RInfra बॅटरी निर्मिती प्रकल्पही उभारणार आहे. या बॅटरीचा वापर वीज स्टोर करण्यासाठी केला जाणारे. त्यांचा वापर पॉवर ग्रीड आणि इलेक्ट्रिक वाहनांमध्ये केला जाईल. मुश्ताक हुसेन बॅटरी निर्मितीची जबाबदारी सांभाळणार आहेत. ऑटोमोबाईल्स, रिन्यूएबल एनर्जी, इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स आणि पॉवर टूल्स या क्षेत्रात त्यांना २५ वर्षांचा अनुभव आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) आणि टेस्ला सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये त्यांनी महत्त्वाची पदं भूषविली आहेत.
स्टॉकची स्थिती काय?
कंपनीच्या या निर्णयामुळे त्याच्या शेअरमध्ये काहीशी तेजी आली. मंगळवारी कंपनीचा शेअर १.७० टक्क्यांनी वधारून २४८.८० रुपयांवर बंद झाला. अनेक काही दिवसांनंतर कंपनीच्या शेअरमध्ये काहीशी वाढ दिसून आली.
मंगळवारी कंपनीच्या शेअरची सुरुवात तेजीने झाली. सोमवारी तो २४४.६५ रुपयांवर बंद झाला आणि मंगळवारी २४८.३० रुपयांवर उघडला. दिवसभरात तो २५६.७० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. मात्र, नंतर त्यात काहीशी घसरण झाली.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)