न्यूयॉर्क : वेदांता समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष अनिल अग्रवाल यांचे ४९ वर्षीय सुपुत्र अग्निवेश अग्रवाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने न्यूयॉर्क मध्ये निधन झाले. या भीषण आघातानंतर अनिल अग्रवाल यांनी आपल्या मुलाला दिलेले वचन पुन्हा एकदा अधोरेखित केले असून, आपल्या संपत्तीतील ७५ टक्क्यांहून अधिक हिस्सा समाजासाठी दान करण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला आहे.
आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात काळा दिवस आहे, असे अग्रवाल यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले आहे.
खाणकाम क्षेत्राला आधुनिक बनवणारे नेतृत्व
अग्निवेश यांनी खाणकाम क्षेत्राला आधुनिक रूप देण्यात व संयुक्त अरब अमिराती मध्ये सोन्याची रिफायनरी उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अग्निवेश हे तलवंडी साबो पॉवर लिमिटेडच्या बोर्डावर होते. २०१९ पर्यंत त्यांनी हिंदुस्तान झिंक लिमिटेडचे अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळली. त्यांनी ‘फुजैराह गोल्ड’च्या स्थापनेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. ही सोने आणि चांदीची एक मोठी रिफायनरी आहे.
अग्निवेश अग्रवाल यांची संपत्ती किती?
अग्निवेश देशातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एका कुटुंबाच्या अब्जावधींच्या संपत्तीचे वारसदार होते. वडील अनिल अग्रवाल यांची एकूण संपत्ती सुमारे २७ हजार कोटी रुपये आहे. अग्निवेश देशातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एका कुटुंबाच्या अब्जावधींच्या संपत्तीचे वारसदार होते. वडील अनिल अग्रवाल यांची एकूण संपत्ती सुमारे २७ हजार कोटी रुपये आहे.
काय होते स्वप्न?
देशात कोणताही मुलगा उपाशी झोपू नये, शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये व प्रत्येक तरुण आत्मनिर्भर असावा, असे अग्निवेश यांचे स्वप्न होते. मी अग्नीला वचन दिले होते की, आम्ही जे काही कमावू त्यातील ७५ टक्क्यांहून अधिक हिस्सा समाजाला देऊ. आज मी त्या वचनाचा पुनरुच्चार करतो आणि यापुढे अत्यंत साधे जीवन जगण्याचा निर्धार करतो, असे त्यांनी म्हटले आहे.
या कंपन्यांमध्ये संचालक म्हणून कार्य
- तेंगपानी टी कंपनी लिमिटेड
- ट्विन स्टार इंटरनॅशनल लिमिटेड
- स्टरलाइट इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड
- स्टरलाइट इन्फ्रास्ट्रक्चर होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड
- स्टरलाइट आयर्न अँड स्टील कंपनी लिमिटेड
- प्राइमेक्स हेल्थकेयर अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड
