M&M History: आनंद महिंद्रा यांच्या नेतृत्वाखालील महिंद्रा अँड महिंद्रा म्हणजेच M&M कंपनीला आज प्रत्येकजण ओळखतो. पण, तुम्हाला माहीत आहे का की एकेकाळी या कंपनीचा भागीदार एक पाकिस्तानी व्यक्ती होती आणि M&M मधील दुसऱ्या 'M' चा अर्थ महिंद्रा नसून 'मोहम्मद' असा होता? कदाचित नसेल, तर चला या कंपनीबद्दल काही रंजक गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करू. आज ही कंपनी २० क्षेत्रांमध्ये काम करते आणि तिची धुरा आनंद महिंद्रा यांच्या हातात आहे.
तसं पाहता महिंद्रा कंपनीची स्थापना कैलाश चंद्र महिंद्रा आणि जगदीश चंद्र महिंद्रा यांनी केली होती. कंपनीत गुलाम मोहम्मद हे आणखी एक भागीदार होते. त्यांच्या नावामुळेच तेव्हा कंपनीचे पूर्ण नाव 'महिंद्रा अँड मोहम्मद' असं होतं. १९४७ च्या फाळणीनंतर महिंद्रा भारतातच राहिले, पण मोहम्मद पाकिस्तानात निघून गेले आणि त्यासोबतच कंपनीच्या नावातील दुसऱ्या 'M' चा अर्थही बदलला. एकेकाळी महिंद्रा अँड मोहम्मद नावानं ओळखली जाणारी कंपनी आज 'महिंद्रा अँड महिंद्रा' बनली आहे.
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
कशी झाली दोघांची भागीदारी?
महिंद्राची सुरुवात एका स्टील ट्रेडिंग कंपनीच्या रूपात झाली होती. १९४५ मध्ये पंजाबमधील लुधियाना शहरात राहणाऱ्या कैलाश चंद्र महिंद्रा आणि जगदीश चंद्र महिंद्रा या दोन भावांनी ही कंपनी सुरू केली होती. या दोन भावांसोबत गुलाम मोहम्मद हे कंपनीचे भागीदार होते. याचा अर्थ असा की ही कंपनी तिघांनी मिळून सुरू केली होती आणि तिचे नाव 'महिंद्रा अँड मोहम्मद' ठेवण्यात आलं होतं. महिंद्रा बंधूंनी कंपनीच्या नावामध्ये मोहम्मद यांचा समावेश यासाठी केला होता, जेणेकरून त्यांच्या भागीदाराला यात बरोबरीचा हिस्सा असल्याची जाणीव व्हावी. मात्र, कंपनीतील त्यांचा हिस्सा दोन्ही भावांच्या तुलनेत कमी होता.
व्यवसाय विभागला गेला पण ब्रँड टिकून राहिला
१९४७ च्या फाळणीनंतर गुलाम मोहम्मद पाकिस्तानात गेले आणि तिथे देशाचे पहिले अर्थमंत्री बनले. १९५१ मध्ये गुलाम मोहम्मद यांना गव्हर्नर जनरल देखील बनवण्यात आलं. त्यांच्या जाण्यानं महिंद्रा कंपनीचा एक भागीदारही वेगळा झाला. अशा कठीण काळात कंपनीसमोर स्वतःचं नाव आणि ब्रँड टिकवून ठेवण्याचं आव्हान होतं. त्यांच्यासाठी कंपनीचं नाव बदलणं सोपं नव्हतं आणि तेव्हा त्यांनी दुसऱ्या 'M' चा अर्थ बदलून 'मोहम्मद' ऐवजी 'महिंद्रा' असा केला.
आनंद महिंद्रांनी सांगितली होती तेव्हाची आव्हानं
आनंद महिंद्रा यांनी बऱ्याच काळानंतर स्वतः याबद्दल भाष्य केलं होतं. ते म्हणाले होते की, जेव्हा गुलाम मोहम्मद यांनी कंपनी सोडली, तेव्हा कंपनीच्या बहुतेक कागदपत्रांवर 'एम अँड एम' (M&M) असं लिहिलं गेलं होतं. हे सर्व साहित्य वाया जाण्यापासून वाचवण्यासाठी आणि कंपनीचं नाव बदलण्याच्या त्रासापासून वाचण्यासाठी हा शब्द तसाच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि पूर्ण नाव बदलून 'महिंद्रा अँड महिंद्रा' करण्यात आलं. अशा प्रकारे M&M हे नावही कायम राहिलं आणि ब्रँडला याच नावानं पुढे नेण्यात आलं. फाळणीनं दोन्ही भागीदारांना जरी वेगळे केलं असलं, तरी गुलाम मोहम्मद यांचं महिंद्रा कुटुंबाशी असलेले वैयक्तिक संबंध नेहमीच टिकून राहिले. १९५५ मध्ये भारतात आल्यावर त्यांनी सर्वप्रथम महिंद्रा कुटुंबाशीच संपर्क साधला होता.
