वॉशिंग्टन: जागतिक ई-कॉमर्स क्षेत्रातील महाकाय कंपनी ॲमेझॉन पुन्हा एकदा मोठ्या कर्मचारी कपातीची तयारी करत आहे. जगभरातील सुमारे ३०,००० कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करण्याची योजना कंपनीने आखली आहे, जी त्यांच्या एकूण कॉर्पोरेट मनुष्यबळाच्या जवळपास १०% आहे. आजपासून ही नोकरकपात सुरु होणार आहे.
कोरोना महामारीच्या काळात कंपनीने भरमसाठ कर्मचारी भरती केली होती. तेव्हा झालेल्या 'ओवरहायरींग'ची भरपाई करण्यासाठी आणि कंपनीचा वाढलेला खर्च कमी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. ही कपात २०२२ च्या अखेरपासून कंपनीने केलेली सर्वात मोठी कपात ठरणार आहे.
या विभागांना बसणार फटका: नवीन कपातीचा फटका प्रामुख्याने मानव संसाधन, डिव्हाईस, सर्व्हिसेस आणि ऑपरेशन्स या महत्त्वाच्या विभागांना बसणार आहे.
AI मुळे भविष्यात आणखी धोक्याची शक्यता
या कपातीच्या पार्श्वभूमीवर, ॲमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जेसी यांनी यापूर्वीच संकेत दिले होते. कंपनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर वाढवत आहे, ज्यामुळे भविष्यात अनेक पुनरावृत्तीची कामे करणार्या नोकऱ्या संपुष्टात येऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे, खर्चात कपात आणि 'ओवरहायरींग' बरोबरच तंत्रज्ञानातील बदलही या मोठ्या कपातीला कारणीभूत ठरत आहेत.
कर्मचारी वर्तुळात चिंता
ॲमेझॉनच्या या निर्णयामुळे केवळ त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्येच नव्हे, तर संपूर्ण जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरीच्या सुरक्षिततेबद्दल मोठी चिंता व्यक्त होत आहे. मोठ्या टेक कंपन्यांमध्ये अनुभवी कर्मचाऱ्यांनाही आता अनिश्चिततेचा सामना करावा लागतो आहे.
